9 ते 12 जानेवारी दरम्यान बचतगटांच्या स्टॉलसह विविध उपक्रम, कार्यक्रम व स्पर्धा रंगणार
सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सशक्तीकरणाना चालना -किशोर डागवाले
नगर (प्रतिनिधी)- सावेडीत 9 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी मनपाचे माजी सभागृह नेते किशोर डागवाले यांची नियुक्ती करण्यात आली. संयोजन समितीच्या वतीने त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सावित्री ज्योती संयोजन समितीचे प्रमुख संयोजक ॲड. महेश शिंदे, राजकुमार चिंतामणी, श्रीनिवास नागुल, विनोद साळवे, बाळासाहेब पाटोळे, आरती शिंदे, ब्युटीशियन सुमय्या शेख, ॲड. सुनील सूर्यवंशी, नितीन डागवले, प्रकाश डोमकावळे, समीक्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालय, महापालिका, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य), जिल्हा रुग्णालय, समाजकार्य महाविद्यालय, इंडो आयरीश हॉस्पिटल आदींच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
किशोर डागवाले म्हणाले की, सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सशक्तीकरणाना चालना दिली जात आहे. महिला वर्गांसाठी ही एक पर्वणी, तर बचत गटातील महिलांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. गेल्या नऊ वर्षापासून सुरु असलेली ही सामाजिक चळवळ जनजागृतीचे देखील सक्षमपणे कार्य करत आहे. तर विविध सामाजिक उपक्रमांतून गरजूंना आधार दिला जात आहे. अशा लोकचवळीतून निर्माण झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवाचे स्वागताध्यक्षपद भूषविताना अभिमान वाटणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, किशोर डागवाले गेल्या 30 वर्षापासून राजकारणात कार्यरत राहून समाजकारण करत आहे. शिववरद प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य ते सातत्याने करत आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंना आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन मेळावे व इतर उपक्रम सुरु आहेत. या सामाजिक चळवळीतील एक घटक असलेल्या डागवाले यांची सर्वानुमते स्वागताध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या महोत्सवात बचत गट स्टॉल, वस्तू विक्री प्रदर्शन, बचत गटांच्या उत्पादनांचे विविध स्टॉल, सर्व जातीय वधू-वर मेळावा, वीर पत्नींचा गौरव, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, मतदार जागृती अभियान, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, लोककला सादरीकरण, युवक-युवतींसाठी विविध स्पर्धा, कवी संमेलन, व्याख्यान, ब्युटी टॅलेंट शो, लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा चार दिवस मेजवाणी राहणार आहे.