जिल्ह्यात राबविलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याची दखल घेऊन फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने व्होकेशनल एक्सलन्स अवार्डने गौरविण्यात आले. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा सन्मान दिला जातो. पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल हा गौरव करण्यात आला आहे.
या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्ष तथा कॅन्सर सर्जन डॉ. सतीश सोनावणे व जि.प. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दरेकर यांच्या हस्ते पालवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विनोद मोरे, सचिव महेश गोपाळकृष्णन, उपप्रांतपाल ईश्वर बोरा, जे.जे. सायन्स अकॅडमीचे कृष्णकांत झा, योगेश जहागीरदार, व्होकेशनल सर्व्हिस डायरेक्टर विजय निकम, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचे सदस्य उपस्थित होते.
शिवाजी पालवे यांनी जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध देवस्थाने, जिल्हा परिषद शाळा, ओपन स्पेस तसेच एक विद्यार्थी एक वृक्ष, मा के नाम एक पेड, बापाचं झाड, दशक्रिया विधी, वाढदिवस आणि कुटुंबातील मयत सदस्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण, एक मंदिर एक वटवृक्ष असे अनेक उपक्रम राबवले. फक्त वृक्षारोपण न करता, त्याचे संवर्धन देखील करण्यात आले. जिल्ह्यामध्ये जवळपास 22 हजार 700 झाडांचे वृक्षारोपण करणे संवर्धनाचे कार्य सुरु आहे. यामध्ये राष्ट्रीय वृक्ष वड जवळपास 4700 झाडे लावली आहेत. जिल्ह्यात एकप्रकारे वृक्ष क्रांती चळवळ त्यांनी राबवली आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरीचा व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉ. सारिका मोरे, डॉ. प्रसाद उबाळे, रमेश वाबळे, सुजाता वाबळे, मधुर बागायत, ॲड. वैशाली कराळे, टीना इंगळे, विजय इंगळे, प्रदीप ब्रह्मा, अजय पिसुटे, प्रियंका पिसुटे, प्रतापसिंग पांडे, वर्षा पांडे, सुजाता उबाळे, प्रियंका पारीख, श्रद्धा इंगळे, हेमचंद्र इंगळे, डॉ. प्रियंका पाटील, मार्लिन एलिशा, ॲड. हेमंत कराळे यांनी पालवे यांना शुभेच्छा दिल्या. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.