जातमुक्त भारत ध्येयासाठी पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार
जातमुक्त भारत परिवर्तनाची नवी ऐतिहासिक दिशा ठरणार -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “जातिविनाश” संकल्पनेला आधुनिक विचारांची शास्त्रीय जोड देत आयकेटी (एकात्मिक ज्ञान सिद्धांत) आधारित ‘जातमुक्त भारत ध्येय 2037’ ही भारतातील मानसिक, सामाजिक आणि वैज्ञानिक परिवर्तनाची नवी ऐतिहासिक दिशा ठरणार असून, यासाठी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
भारताची सर्वात जुनी गुलामी म्हणजे जातव्यवस्था. ही फक्त सामाजिक रचना नसून मानवी मनावर कोरलेला मानसिक विषाणू आहे. भीती, अज्ञान, धार्मिक विकृती आणि परंपरागत अभिमान यांच्या संगतीत हा विषाणू पिढ्यान् पिढ्या वाढत गेला.
बाबासाहेबांनी स्पष्ट केले की, जातव्यवस्था धर्माच्या नावाखाली निर्माण झालेली अन्यायकारी पद्धती आहे. एकात्मिक ज्ञान सिद्धांताच्या मते सर्व मानवांचे 99.9% जनुवंश (जीन्स) एकसारखे आहेत, म्हणून “जात” या कल्पनेला कोणतेही शारीरिक अथवा वैज्ञानिक अस्तित्व नाही. ती फक्त मानसाच्या अचेतन मनात रोवलेली चुकीची सामाजिक कोडिंग आहे. हा चुकीचा “मनाचा कोड” काढून टाकणे म्हणजेच खरी मानवक्रांती ठरणार असल्याची भावना संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
एकात्मिक ज्ञान सिद्धांत ही मानवी चेतना, अध्यात्म आणि विज्ञान या तीन क्षेत्रांचा एकत्रित अभ्यास करणारी नवी चौकट आहे.
तिची मुख्य प्रस्तावना चेतना ही सर्व जीवांमध्ये समान असलेली सार्वत्रिक ऊर्जा, सर्व मानव हे एकाच निसर्ग-जाळ्याचे घटक, विभाजन, जात, श्रेष्ठता या सर्व मनाने तयार केलेल्या चुकीच्या कल्पना आहे. हा सिद्धांत मानवतेला वैज्ञानिक आधारावर एकत्र आणण्याचा नवा मार्ग दाखवतो.
2030 पर्यंत देशातील सर्व शाळामहाविद्यालयांमध्ये एकात्मिक ज्ञान अभ्यासक्रम लागू करण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांना बालवयापासून शिकवले जाईल, जात ही केवळ कल्पना आहे; मानवता हे वास्तव आहे. समता ही विज्ञानाची शपथ आणि आंबेडकरांचे मूलमंत्र आहे. यातून विद्यार्थ्यांची ओळख “जन्मावर आधारित” न राहता चेतनावर आधारित होणार आहे.
या मिशनमधील सर्वात मोठा सामाजिक बदल म्हणजे निसर्गपाल ही एकात्मिक ओळख. याचा अर्थ पर्यावरणाशी जोडलेली जबाबदारी, नैतिकता, विज्ञान आणि करुणेवर आधारित जीवनमूल्ये. ही भविष्यकाळातील भारताची नवी ओळख ठरणार असल्याची भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.
विचारांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने समाज बदलतो, या तत्त्वावर आधारित उपक्रमाचा यामध्ये समावेश आहे. वृक्षलागवड, वर्षा-ऊर्जा संचय, पाणीसंवर्धन, ग्रामसमृद्धी या प्रकल्पांत सर्व समाजघटक एकत्र काम करतील. सहजीवन, सहकार्य आणि सहानुभूती म्हणजेच नवा सामाजिक स्वभाव निर्माण करणे हे उद्दिष्ट राहणार आहे. जातआधारित राजकारणावर निवडणूक आयोगाची कायदेशीर बंदी, जातभेद प्रतिबंध अधिनियम 2028 चा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे शासन बहुमतात नव्हे तर नैतिक चेतना आणि समतेच्या तत्वांवर आधारित असणार असल्याचे म्हंटले आहे.
