राणा घोड्याच्या नृत्याने ग्रामस्थ मंत्रमुग्ध
धार्मिक उत्साहाचे गावभरात स्वागत
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती गावात रविवारी (दि.17 ऑगस्ट) चैतन्य कानिफनाथ मूर्ती स्थापनेनिमित्त भव्य मिरवणुक काढण्यात आली. सजवलेल्या रथात कानिफनाथ महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत काही युवकांनी नाथांची वेशभूषा परिधान करुन ग्रामस्थांचे लक्ष वेधले. ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय या जयघोषणेने गाव दुमदुमले.
या मिरवणुकीचे आयोजन नाथयोगी परिवार व नेप्ती ग्रामस्थ यांनी केले होते. नेप्ती बायपास येथून निघालेल्या या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, डिजेच्या तालावर नृत्य, महिलांनी रांगोळीने सजविलेले मार्ग, चौकाचौकांत ग्रामस्थांचे पुष्पवृष्टीद्वारे स्वागत असे उत्साहपूर्ण दृश्य पाहायला मिळाले. या उत्सवामुळे नेप्ती गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले.
गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने सडा टाकून मिरवणुकीचा मार्ग सजविला होता. अनेकांनी घरासमोर रांगोळ्या काढून मिरवणुकीचे उत्साहात स्वागत केले. मिरवणुकीत कानिफनाथ भक्तांनी घोषणाबाजी करत भक्तिचे दर्शन घडविले. अशोक आंबेडकर (वडगाव गुप्ता) यांच्या राणा घोड्याने गाण्याच्या ठेक्यावर केलेल्या नृत्याने तर संपूर्ण ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. राणा घोड्याचा नृत्य पाहण्यासाठी महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मिरवणुकीची सांगता कानिफनाथ मंदिर येथे झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.18 ऑगस्ट) दुपारी बारा वाजता बजरंग महाराज शेळके नालेगाव, भिमराज कळमकर, नामदेव बेल्हेकर व कानिफ होळकर यांच्या हस्ते कानिफनाथ मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त कानिफनाथ महाराज मंदिराला रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर कानिफनाथ मूर्ती भोवती आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात कानिफनाथ महाराजांची मूर्ती पूर्वाभिमुख विराजमान केलेली आहे. मूर्तीचे निरीक्षण केल्यास कानिफनाथ महाराज आपल्याकडे पाहत असल्याचा भास होतो. दुपारी एक वाजता होम-हवनाचा धार्मिक सोहळा पार पडला.
सायंकाळी 4 वाजता ह.भ.प. निजाम भाई शेख यांच्या कलगीतुराच्या कार्यक्रमाने उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती दिली. सायंकाळी 6 वाजता झालेल्या महाआरतीत हजारो भक्तांनी सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन नाथयोगी परिवार व नेप्ती ग्रामस्थांनी एकत्रित येऊन केले होते. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे व सर्वांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. नेप्ती गावातील चैतन्य कानिफनाथ मूर्ती स्थापना सोहळा हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा ठरला.