नवयुवकांनी आत्मिक शक्तीचा विकास करून राष्ट्राच्या उभारणीस हातभार लावावा -दत्तात्रय वारकड
ध्यानयोग, सकारात्मकता आणि स्वानुशासनातूनच व्यक्तिमत्व विकासाचे धडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण उपसंचालक पुणे विभाग व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय, अहिल्यानगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अधिक 2 स्तरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा अंतर्गत अमृताचे बोल व विशेष उपक्रम राबविण्यात आले. शिबिराचे आयोजन श्रीराम विद्यालय, राळेगण म्हसोबा (ता. पारनेर) येथे करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, श्रमदान, सामाजिक उपक्रम आणि मार्गदर्शनपर व्याख्यानांचे विविध कार्यक्रम पार पडले.
या उपक्रमांतर्गत लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांचे “आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव व व्यक्तिमत्व विकास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दत्तात्रय वारकड म्हणाले की, आत्मिक शक्तीचा विकास झाला, तर व्यक्ती घडते आणि व्यक्ती घडली की राष्ट्र आपोआप विकसित होते. आत्मिक शक्ती वाढविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय, नियमित ध्यानयोग, दररोज व्यायाम, सकारात्मक व प्रेरणादायी पुस्तके वाचन, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन व चांगल्या विचारांची संगत ठेवण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, विचार जीवनावर राज्य करतात आणि कल्पना जग बदलतात. आनंदी मन, सकारात्मकता आणि दृढ इच्छाशक्ती यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन अधिक उज्ज्वल बनते. सोशल मीडिया, नकारात्मक बातम्या आणि मोबाईलवरील अनावश्यक वेळ खर्चामुळे विद्यार्थी महत्त्वाचा वेळ वाया घालवत असल्याचे वारकड यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा वापर फक्त कामापुरता करा. अतिरिक्त वापरामुळे आरोग्य, मानसिक स्थिती आणि अभ्यासावर गंभीर परिणाम होतात. रोजचा एक तास व्यक्तिमत्व विकासासाठी खर्च केला तर एका वर्षात 365 अतिरिक्त तास म्हणजेच साडेतेरा महिने इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक कार्य करू शकता, असे प्रभावी विश्लेषण त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
ध्यानाचे महत्व सांगताना वारकड यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचा दाखला देत म्हंटले, बाहेरील जगापेक्षा मोठे जग आपल्यात आहे. अंतरात्म्याचा शोध घेतला तर इच्छित फळप्राप्ती शक्य होते. त्यांनी ‘विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले’ या अभंगाचे उदाहरण देत ध्यानाचे गूढ विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वारकड यांनी पुढील मूल्यांचा अंगीकार करण्याचेही आवाहन केले. गुरुजनांचा आदर, मातापित्यांची सेवा, ब्रह्मांडाबद्दल कृतज्ञता, समाजहितासाठी सकारात्मक भाव, संत, महंत व समाजसुधारकांनी दिलेल्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्याख्यान प्रसंगी प्राध्यापक वृंद, प्रा. सौ. प्रतिभा पवार, प्रा. प्रमिला तांबे, प्रा. गीतांजली जोंधळे, प्रा. मीरा जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब दुधाडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अतिथी परिचय डॉ. दत्तात्रय नकुलवाड यांनी केले, तर प्रा. प्रमिला पवार यांनी आभार मानले.
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातील उपक्रमांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ. ए. इ. आठरे, डॉ. एस. बी. कळमकर व प्रा. कल्पना दारकुंडे यांनी केले.
