• Tue. Jul 8th, 2025

न्यायदानच्या क्रांतीसाठी इंडिया अगेन्स्ट ज्युडिशिअल एंट्रॉपी चळवळ

ByMirror

Jul 7, 2025

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार


केवळ कायदेशीर सुधारणा नसून, भारतीय लोकचेतनेच्या पुनरुज्जीवनाची व्यापक चळवळ बनणार -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- भारतीय न्यायव्यवस्था सध्या एका गंभीर संक्रमणातून जात असताना पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने इंडिया अगेन्स्ट ज्युडिशिअल एंट्रॉपी नावाची व्यापक चळवळ हाती घेण्यात आली आहे.


न्यायिक एंट्रॉपी म्हणजेच कार्यक्षमतेचा, नैतिकतेचा आणि गतिशीलतेचा सातत्याने होत असलेला ऱ्हास ही आजच्या काळातील सर्वात मोठी न्यायिक अडचण बनली आहे. परंतु याचा नवा अर्थ लावत आणि सुजाण मार्ग शोधत इंडिया अगेन्स्ट ज्युडिशिअल एंट्रॉपी नावाची क्रांती पुढे आली आहे. ही केवळ कायदेशीर सुधारणा नसून, भारतीय लोकचेतनेच्या पुनरुज्जीवनाची व्यापक चळवळ राहणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


भारतात 5 कोटींपेक्षा जास्त खटले अद्याप प्रलंबित आहेत. हे चित्र केवळ न्यायालयीन ढिसाळतेचे नाही, तर सामान्य जनतेमध्ये असलेल्या नैतिक-सामाजिक सूक्ष्म चेतनेच्या क्षयाचेही द्योतक आहे. खटल्यांचा प्रचंड विलंब सामान्य नागरिकाचे आयुष्यच थांबून जाते. भ्रष्टाचार आणि अपारदर्शक निर्णयप्रक्रिया, कायदेशीर भाषेची क्लिष्टता सामान्य माणसाला कायद्याची भाषा समजत नाही. नैतिक दुर्बलता, कायदा आहे, पण न्याय नाही, यालाच न्यायिक एंट्रॉपी म्हणतात, आणि हीच बाब देशाच्या न्यायिक विश्‍वासावर घाला आणत असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.


इंडिया अगेन्स्ट ज्युडिशिअल एंट्रॉपीफ उपक्रमात भारतीय ज्ञानसंपदा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नैतिक मूल्ये यांची सांगड घालणारे 5 ठोस उपाय सुचवण्यात आले आहेत. हे उपाय न्यायिक व्यवस्थेत सूक्ष्म-चेतनेचा विस्फोट घडवणारे आहेत.
न्यूरोप्लास्टिसिटी लॅब्स: जिल्हा न्यायालयांत मानसिक-नैतिक निर्णयक्षमतेचा विकास, सहानुभूती आणि लोकहित शिक्षणावर आधारित कार्यशाळा.


न्यायकाल एंट्रॉपी निर्देशांक: न्यायप्रक्रियेतील विलंबाचा समाजावर होणारा मानसिक, आर्थिक आणि नैतिक परिणाम मोजणारा डेटा-आधारित निर्देशांक.


नॉनिटिक इनहेरिटन्स चेंबर्स: भारतीय लोककथा, ऐतिहासिक अनुभव, सामाजिक बोधकथा यांना न्यायिक व्याख्येत समाविष्ट करून निर्णय अधिक मानवकेंद्रित करणे.


एआय आधारित नैतिक प्रणाली: तंत्रज्ञानाच्या साहाय्याने न्यायनिर्णय पारदर्शक आणि नैतिक बनवण्याचा उपक्रम मानवी अभिप्रायासह सतत सुधारणारा वापरणे.


निसर्गपाल न्याय व राज्यघटनात्मक अध्यात्म: पर्यावरण, संवेदनशीलता, नैतिकता यांना न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवणारा उपक्रम या चळवळीत समाविष्ट करण्यात आला आहे.


याच्या अंमलबजावणीचे टप्पे म्हणून विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकसंवेदना यांचा मिलाप, जिल्हा न्यायालयांमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी वर्कशॉप्स, न्याय नैतिकतेवरील अभ्यासक्रम, ग्राम न्यायालयांत निसर्गपाल न्याय प्रकल्प, न्यायप्रक्रियेतील गतिशीलता मोजणारे मोबाइल ॲप्लिकेशनचा समावेश करण्याचा या चळवळीचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *