वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते वैभव पाचारणे यांनी वन विभागाकडे पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
केडगावमधील विविध भागांत नागरिकांनी बिबट्याचे अनेकवेळा दर्शन घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. संध्याकाळनंतर नागरिक अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळत आहेत, तर शेतकऱ्यांनाही शेतात जाण्याची धास्ती वाटत आहे.
वैभव पाचारणे यांनी सांगितले की, वन विभागाने आतापर्यंत काही प्राथमिक उपाययोजना केल्या असल्या तरी त्या अपूर्ण आणि तोडक्या पडत असून बिबट्याला पकडण्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही. बिबट्याचा वावर असलेल्या विविध ठिकाणी पिंजरे बसवणे आवश्यक आहे. सध्या असलेले पिंजरे अपुरे असून, अधिक पिंजरे बसविल्याशिवाय बिबट्या पकडला जाणार नाही.
या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “पिंजरे शिल्लक नाहीत” असे उत्तर मिळाल्याचे पाचारणे यांनी स्पष्ट केले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वन विभागाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या कारवाईची गरज असल्याचे म्हंटले आहे.
बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करुन, नागरिकांमधील भीती कमी करावी. शेतांमध्ये आणि वस्ती परिसरात निगराणी व गस्त वाढवावी, आवश्यकतेनुसार बाहेरील विभागांमधून पिंजरे उपलब्ध करण्याची मागणी पाचारणे यांनी केली आहे.
