आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधांचा समावेश; वेब कॅमेऱ्याद्वारे मोठ्या शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची सोय
बोथरा परिवार व पारस ग्रुपचे आर्थिक योगदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधांनीयुक्त नुतनीकरण करण्यात आलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचा (एनआयसीयु विभाग) लोकार्पण करण्यात आले. स्व. माणकचंद बोथरा व स्व.सौ. जतनबाई मानकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार आणि पारस ग्रुपच्या योगदानातून उभारलेल्या या विभागाचे उद्घाटन उद्योजक प्रेमराज बोथरा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी उद्योजक संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनिषा बोथरा, संगिता बोथरा, प्रतिभा बोथरा, प्रणेश बोथरा, रोनक बोथरा, गौरव बोथरा, रोहन बोथरा, प्रसन्ना बोथरा, प्रणिता बोथरा, खुशबू बोथरा, समिक्षा बोथरा, श्रेया बोथरा, दर्शिका बोथरा, तेजल पगारिया, मिहान बोथरा, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, माणकचंद कटारिया, बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रेयस सुरपुरिया, डॉ. सोनाली कणसे, डॉ. वैभवी वंजारे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात वसंत कटारिया म्हणाले की, जिल्ह्यात आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून अद्यावत दर्जाचे एनआयसीयु सेंटर कार्यान्वित झाले आहे. काही नवजात बालकांना तातडीने उपचाराची गरज भासत असते. ही गरज ओळखून अद्यावत एनआयसीयु सेंटरची पायाभरणी बोथरा परिवाराच्या माध्यमातून झाली आहे. श्रीमंतांबरोबर गरिबांना देखील ही आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. जागतिक दर्जाचे मशनरी या विभागात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पारस उद्योग समूहाच्या माध्यमातून बोथरा परिवार आरोग्य सेवेच्या महायज्ञात सर्वपरीने योगदान देत आहे. मोठमोठे प्रकल्प राबवून आरोग्य सेवेचे व्रत अविरतपणे पुढे चालवले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मुलींना वाचवण्यासाठी देखील मोठे प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रेमराज बोथरा म्हणाले की, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा दिली जात आहे. या सेवेत बोथरा परिवार योगदान देत आहे. पूर्वीच्या एनआयसीयु सेंटरला अद्यावत करुन मोठ्या शहराच्या धर्तीवर बालकांना उपचार उपलब्ध होणार असून, भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी ही सेवा गरजूंना आधार ठरणार आहे. गोरगरीबांना आधार ठरत असलेले आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव देशभरात नावरुपास आले असल्याचे त्यांनी सांगितले.
संतोष बोथरा म्हणाले की, समाजाची गरज ओळखून 15 बेडचे एनआयसीयु सेंटरचे 30 बेड अद्यावत विभागात रुपांतर करण्यात आले आहे. अद्यावत सुविधांसह तज्ञ डॉक्टर बालकांच्या उपचारासाठी चोवीस तास उपलब्ध होणार आहे. पुणे, मुंबईच्या धर्तीवर शहरात बालकांना आरोग्यसेवा मिळणार असून, एखाद्या बालकाची प्रकृती चिंताजनक असल्यास वेब कॅमेऱ्याद्वारे पुणे, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली येथील बालकांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत बालकांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात मुलींवर उपचाराची वेळ आल्यास त्यांना सोडून दिले जाते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना वाचविण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. ग्रामीण भागातील कुटुंबीयांना मोठ्या शहरात जाऊन महागडे उपचार घेणे अशक्य होते. अशा परिस्थितीमध्ये हे एनआयसीयु सेंटर त्यांना नवजीवन देण्याचे काम करणार आहे. या सेवेसाठी बोथरा परिवाराला संधी मिळणे हे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित बालरोग तज्ज्ञ यांनी नव्याने झालेल्या एनआयसीयु विभागाची माहिती दिली. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
नियोनेटल आयसीयू टर्सरी केअर सेंटर असून सर्व नवजात बालकांच्या आजारावर सेवा त्याचप्रमाणे अत्यंत कमी वजनाचे व मुदतीपूर्व जन्मलेल्या बाळांसाठी सेवा प्रदान करणार आहे. या एनआयसीयु मध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे विविध उपकरणांचा समावेश आहे. यामध्ये वॉर्मर, कृत्रीम श्वासोच्छावास यंत्रणा, फोटो थेरपी, रक्तसंक्रमण, सरफेस्टंटॲडमिनिस्ट्रेशन सेंट्रल लाईन इन्सर्टेशन, नवजात शिशुचे विविध प्रक्रिया, नवजात शिशु शस्त्रक्रिया, एका छताखाली टुडी इको, सोनोग्राफी, एमआरआय, सिटीस्कॅन, पॅथॉलॉजी, एक्स रे, प्रशिक्षण नर्सिंग स्टाफ, कांगारू मदर केअर, विकासात्मक सहाय्यक काळजी, आईच्या दुधाच्या आहारासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सुविधांचा समावेश आहे.