सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारांवर निशुल्क दिले जाणार उपचार
व्याधीमुक्तीच्या कार्यासाठी नेहमीच सहकार्य -मंगला रूणवाल
नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल संचलित सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारांपासून मुक्ती विभागाचे अद्यावत व नूतनीकरण दालनाचे लोकार्पण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सतीश रुणवाल व मंगला रूणवाल यांच्या हस्ते पार पडले. योगातील सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारापासून मुक्ती देणाचा निशुल्क उपक्रम मागील 8 वर्षापासून सुरु आहे. ब्लड बँक येथे कार्यरत असलेल्या या विभागाचे नूतनीकरण संथारा व्रतधारी श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदजी रुणवाल (बिजापूर, पुणे) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी याप्रसंगी उद्योजक प्रेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनीषा बोथरा, संगीता बोथरा, प्रतिभा बोथरा, तेजल पगारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रणेश बोथरा, रोहन बोथरा, रौनक बोथरा, विभाग प्रमुख प्रसाद जोशी, सायली जोशी, प्रा. महेश जोशी, प्रणेश्वर जोशी, प्रशिक्षिका प्रज्ञा दंडवते आदी उपस्थित होते.
मंगला रूणवाल म्हणाल्या की, मणके विकाराची व्याधी झपाट्याने वाढत असून, त्यासाठी योग आणि त्यातील सूक्ष्म व्यायाम पद्धती उपयोगी ठरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून मणके विकारापासून त्रस्त असलेल्यांना आराम मिळाला आहे. या व्याधीमुक्तीच्या कार्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असून, सासू असलेल्या संथारा व्रतधारी श्रीमती पानाबाई रुणवाल यांच्या प्रेरणेने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दवा बरोबर दुवा आणि व्यायाम पद्धतीने निरोगी जीवनाचा मंत्र देखील दिला जात आहे. औषधोपचार बरोबर निरोगी आरोग्यासाठी योगाचा अभ्यास यावर देखील जागरूकता निर्माण होण्यासाठी उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसाद जोशी म्हणाले की, 1 जुलै 2017 पासून सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारापासून मुक्ती हा विभाग आनंदऋषीजी हॉस्पिटल ब्लड बँक येथे सुरू आहे. गेल्या पाच वर्षात 3 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी या विभागात उपचार घेतले असून, त्यांना त्याचा चांगला लाभ झाला आहे. अनेकांना रस्त्यावरील खड्डे, अधिक तास बैठे काम, सततचे प्रवास, किचनमध्ये सततचे काम इत्यादी कारणांमुळे मणके विकारांच्या समस्या उद्भवतात. मणके विकारांवर उपचारासाठी औषधोपचारापेक्षा व्यायाम पद्धतीचा अधिक प्रभावी ठरत असल्याचे या विभागाद्वारे सिध्द झाले असून, याचा अनेक नागरिक लाभ घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मणक्यात गॅप पडणे, गादी सरकणे, कंबर दुखी, पाठ दुखी, मानेचे दुखणे, गुडघेदुखी इत्यादी विकारांचा त्रास रुग्णांना व्यायामाच्या साध्या सोप्या व तितकाच परिणामकारक पद्धतीने शिकवले जातात. रुग्णांना हमखास गुण येत असल्याची भावना येणारे रुग्ण प्रतिक्रिया देत आहेत. सतत मुंग्या येणे, पूर्ण पाय दुखणे, मान अवघडणे, हातापायाला बधीरता जाणवणे इत्यादी लक्षणावर व्यायाम पद्धतीचा लाभ परिणामकारक असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद जोशी 9921272306 यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.