नवीन वर्षाची ग्रामस्थांना आरोग्यदायी भेट; अल्पदरात क्षारसूत्र शस्त्रकर्म शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
आयुर्वेदातून जुनाट आजारांवर प्रभावी उपचार शक्य -डॉ. सतीश राजूरकर
जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर, योगदान (डॉ. पुंड) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोहिनी चॅरिटेबल ट्रस्ट, जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर, योगदान (डॉ. पुंड) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि शुभम आयुर्वेदालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 1 जानेवारी) मोफत तपासणी व अल्पदरात क्षारसूत्र (शस्त्रकर्म) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्ह्यातील विविध भागांतील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हे शिबिर योगदान (डॉ. पुंड) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुष्कराज पॅलेस, बागडेमळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर येथे पार पडले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी योगदान हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुश्रुत संजय पुंड, डॉ. संजय पुंड, डॉ. रजनिकांत पुंड, जायंट्स ग्रुपचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अनिल गांधी, डॉ. विनय शहा, माजी महापौर भगवान फुलसौफ्लदर, डॉ. विनायक हडके (शस्त्रक्रिया विभाग प्रमुख, पीएमटी लोणी), डॉ. मनिषा संजय पुंड, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. संगिता कुलकर्णी, सौ. योगिता पुंड, डॉ. शरद ठुबे, डॉ. विजय नांदुरकर, डॉ. प्रभास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात मुळव्याध, भगंदर, हायड्रोसिल, हर्निया, सुंता (Circumcision), स्तनातील गाठी तसेच शरीरावरील विविध गाठी यांची मोफत तपासणी व तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांवर लेझर थेरपी, क्षारसूत्र थेरपी तसेच शस्त्रक्रिया (ऑपरेशन) अल्पदरात करण्यात आल्या. विशेष म्हणजे महिलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित तपासणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. राजूरकर म्हणाले की, आयुर्वेद पद्धतीद्वारे अनेक जुनाट व गंभीर आजारांवर प्रभावी उपचार शक्य असून, रुग्णांना दीर्घकालीन दिलासा मिळतो. आयुर्वेदातून अनेक गंभीर आजार बरे झालेले रुग्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे म्हणाले की, सामाजिक कार्याबरोबरच आरोग्य क्षेत्रातही जायंट्स ग्रुप सातत्याने योगदान देत असून, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतो. या शिबिरातून अनेक गरजूंना लाभ झाला असून, ग्रामीण भागातून आलेले ग्रामस्थांनी याचा लाभ घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल शेटीया व अनिल गांधी यांनी विशेष सहकार्य केले.
