लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीबाबत होणार चर्चा
समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- सकल मातंग समाजाच्या वतीने शहरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणी संदर्भात रविवारी (दि.10 ऑगस्ट) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सिद्धार्थ नगर येथील साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौकाजवळील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत दुपारी 3.30 वाजता होणार असून, या बैठकीला सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लालटाकी, अप्पूहत्ती चौकात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणीसाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे. या बैठकीत सकल मातंग समाज, विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच लहू सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या सन्मानार्थ शहरात पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी कशी करता येईल, यावर व्यापक चर्चा होणार आहे.
बैठकीनंतर पूर्णाकृती पुतळा समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती पुढील नियोजन, शासकीय परवानग्या, निधी संकलन, जागा निश्चिती, व मूर्तीकार निवड यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर काम करणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमात सर्व समाजबांधवांनी सक्रिय सहभाग घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
