सामाजिक कार्यकर्त्यांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
अवैध व्यावसायिकांना पोलीसांकडूनच अभय मिळत असल्याचा आरोप; अर्थपूर्ण संबंध ठेवणाऱ्या पोलीसांची मोबाईची सीडीआर तपासणी करुन नार्को टेस्टची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर व तालुका परिसरात सुरु असलेले अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावे व या अवैध व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक व त्यांच्या वसुली कर्मचाऱ्यांच्या मोबाईची सीडीआर तपासणी करुन नार्को टेस्ट करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भागचंद नवगिरे, लहू खंडागळे, आशिष मोटे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अवैध व्यावसायिकांना पोलीसांकडूनच अभय मिळत असल्याने युवा पिढी बर्बाद होत असून, गोरगरीबांचे संसार उध्वस्त होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्रीरामपूर व तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोफावले आहे. यामध्ये मटका, बिंगो, फंटा मटका, मुंबई कल्याण मटका, जॅकपॉट, ऑनलाईन जुगार, पत्त्याचे क्लब, हातभट्टी, गांजा विक्री यांसारख्या अवैध व्यवसायांचा समावेश आहे. हे अवैध व्यवसाय बंद होण्यासाठी उपोषण देखील करण्यात आले होते. पोलीस प्रशासनाचा अवैध व्यवसायांवर वचक राहिलेला नसून, सर्व तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अवैध व्यावसायिकांकडून आठवडा, पंधरवाडा व महिन्याला तीन टप्प्यात हप्ते वसुली सुरु असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
जुगाराला मोलमजुरी करणारे सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहे. तर व्यसनाच्या आहारी जाऊन युवक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. येथील अवैध धंदे पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. या अवैध व्यावसायिकांकडून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काही पोलीस वसुलीसाठी नेमण्यात आले आहे. त्यांना फक्त हप्ते गोळ्या करण्याचेच काम देण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
युवा पिढी बर्बाद करणारे व गोरगरीबांचे संसार उध्वस्त करणारे अवैध व्यवसाय त्वरीत बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर अवैध व्यवसायांना अभय देऊन अवैध व्यवसायिकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक व वसुली कर्मचारींची सीडीआर तपासणी करुन नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस महानिरीक्षक (नाशिक) यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
