• Sun. Mar 16th, 2025

समाजापुढे मानवी तस्करी गंभीर प्रश्‍न -सत्र न्यायाधीश अंजु शेंडे

ByMirror

Mar 16, 2025

जिल्हा न्यायालयात मानवी तस्करी, वेठ बिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण व प्रक्रिया कार्यशाळा उत्साहात

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा संयुक्त उपक्रम; वकिलांसह सामाजिक संस्थांना मार्गदर्शन

नगर (प्रतिनिधी)- भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष होवून देखील आज ही अनेक ठिकाणी गरीब माणसाना प्राण्यासारखी वागणूक दिली जात आहे. मानवी हक्काची जपवणुक होण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती व्हायला हवी. समाजापुढे मानवी तस्करी गंभीर प्रश्‍न निर्माण होत असताना नागरिकांमध्ये जागृती आवश्‍यक आहे. मानवी तस्करी, वेठबिगारी कमी करण्यासाठी अनेक संस्था पुढे येवून काम करत आहे. अमृवाहिनी या संस्थेने मागील काही वर्षात वेठबिगार निर्मूलनासाठी केलेले काम कौतुकास्पद आहेच आणि गरजेचे देखील असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी केले.


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी तस्करी, वेठ बिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण व प्रक्रिया या एकदिवशीय कार्यक्रम जिल्हा सत्र न्यायालयात पार पडले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेंडे बोलत होत्या.


जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, श्री अमृतवाहीनी ग्रामविकास मंडळ तर्फे वेळोवेळी मानवी तस्करी रोखणे व वेठबिगारी मुक्ततेसाठी प्रयन्त्न केले जाते, ही खूप मोठी सामाजिक चळवळ आहे. वेठबिगारी निर्मूलन व मानवी तस्करी कायदा व प्रक्रिया ही एकदिवशीय कार्यशाळेमुळे जनजागृती तर होईलच तसेच कायद्यातील कलम, पुनर्वसन प्रक्रिया, शासनाकडून मिळणारे आर्थिक मदत, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या कार्यशाळेमुळे पॅनल वकील व अधिकार मित्र यांना नव्याने शिकायला मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख यांनी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ ही संस्था मागील दोन दशकापासून सामाजिक काम करत आहे, रस्त्यावरील बेवारस मनोरुग्ण, अनाथ, निराधार, वंचित, महिला, पुरुष व बालकांकरिता अहोरात्र परिश्रम घेत आहे. हे सामाजिक काम करत असताना मागील दोन वर्षापासून वेठबिगाराचे प्रमाण वाढत असल्याचे संस्थेच्या संचालक मंडळाच्या लक्षात आले, तेव्हा संस्थेमार्फत वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, शासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत आदी स्तरावर वेठबिगार कार्यक्रमाचे नियोजन करून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात मानवी तस्करी प्रक्रियेवर पॅनल वकील व अधिकार मित्र (पीएलव्ही) यांना वेठबिगार निर्मूलन कायदा 1976 व मानवी तस्करी, बालमजुरी, बालविवाह यासारख्या कायद्यांवर मार्गदर्शन करुन प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ॲड. तृप्ती पाटील (डीएलएसए पॅनल लॉयर ठाणे स्पेशल सेल), गोरख जाधव (सिनियर असोसिएट, इंटरनॅशनल जस्टिस मिश, मुंबई) व अमृतवाहिनी संस्थेचे सदस्य अंबादास गुंजाळ यांची उपस्थित होती.


या कार्यक्रमाप्रसंगी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. सागर पादीर, ॲड. संदीप वांढेकर, ॲड. रावसाहेब बर्डे, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. भक्ती शिरसाठ, ॲड. बेबी कोरडे, ॲड. मनीषा पंढरी, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. निशिता देशमुख, ॲड. आशा गोंधळे, अधिकार मित्र (पीएलव्ही) प्रभाकर धिरडे, किशोर धोटे, तनिज शेख, शोभा गाडे आदी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिराज शेख, आंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयूरी वनवे, राहुल साबळे आदींनी परिश्रम घेतले. शिवानी शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले. संध्या कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *