राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट व पंजाबी सेवा समितीच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सहभागाची गरज -महापौर ज्योतीताई गाडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट व पंजाबी सेवा समितीच्या वतीने नवनिर्वाचित महापौरांसह नगरसेवकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला समाजातील विविध घटकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
सत्कार सोहळ्याची सुरुवात श्री राधा-कृष्ण मंदिरात विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित महापौर ज्योतीताई गाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक मोहित पंजाबी, जय भोसले, ऋग्वेध गंधे, राजू (मामा) जाधव आणि हरप्रीतकौर गंभीर यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, नगरकरांनी महायुतीकडे एकहाती सत्ता देऊन मोठा विश्वास व्यक्त केला आहे. आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास सुरू राहणार असून, या विकासकामांना अधिक गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील.
त्या पुढे म्हणाल्या की, अहिल्यानगरचा विकास हा केवळ योजनांवर अवलंबून नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागावरही तितकाच अवलंबून आहे. राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट व पंजाबी सेवा समितीसारख्या संस्था समाजसेवा, अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम साधत समाजासाठी मोलाचे कार्य करत आहेत, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. शहरातील प्रत्येक विभागात दर्जेदार रस्ते, स्वच्छता व्यवस्था, सुशोभित उद्याने आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य असेल. अहिल्यानगरला खऱ्या अर्थाने आदर्श शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्वस्त उपस्थित होते. शीख आणि पंजाबी समाज बांधव तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमात धार्मिक वातावरणासह सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. तसेच या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक गिरधारीलाल नय्यर व गुलशनशेठ जग्गी यांचा निस्वार्थ सामाजिक सेवेबद्दल गौरव करण्यात आला. या निवडणुकीत समाजातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले त्या युवकांचा देखील सत्कार करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी आणि समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात राकेश गुप्ता म्हणाले की, राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट आणि पंजाबी सेवा समितीच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक कार्य सुरु आहे. नव-नियुक्त नगरसेवकांचा सत्कार म्हणजे त्यांच्या जनसेवेसाठी दिलेल्या शुभेच्छा आहेत. महापालिकेचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आपल्या विकासकामांमधून शहराचा कायापालट करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्टच्या सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतले.
