घोडेगाव-कुकाणा राज्य मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम उप विभागाने बजावल्या होत्या नोटीसा
नगर (प्रतिनिधी)- घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 च्या रुंदीकरणासाठी चांदा (ता. नेवासा) येथील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दिलेल्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगितीचे आदेश दिले.
चांदा (ता. नेवासा) येथील घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम उप विभागाने रस्त्याच्या जवळ राहणारे रहिवासी व व्यावसायिक यांना अतिक्रमण काढण्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी नोटीस दिली होती.
सदर नोटीस विरोधात चांदा येथील मालमत्ता धारक मुंतजीर राजू शेख व कालू लालू शेख यांनी ॲड. श्रीनिवास एस. वाघ यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर याचिकाकर्ते यांचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मंगेश पाटील व न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी 19 मार्च रोजी अतिक्रमण नोटीसला स्थगितीचे आदेश पारित केले आहे.