सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
फुले दांम्पत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज -अनिल साळवे
नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने गजानन कॉलनी नवनागापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक कल्याण योजने अंतर्गत काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी कॉलेजच्या सहकार्याने शिबिर पार पडले.
नवनागापूर गावचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब दांगट, सागर सप्रे, संजय चव्हाण, अप्पासाहेब सप्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. बबनराव डोंगरे म्हणाले की, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्री मुक्तीची चळवळ चालवली. मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी खुले केले. त्यांनी दिलेल्या योगदानाने आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई यांनी समाजाला प्रकाशमान केले. ही ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य उमेद सोशल फाऊंडेशन सारख्या संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्यांनी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची बीजे रोवली. फुले दांम्पत्यांच्या शैक्षणिक चळवळीने सामाजिक क्रांती झाली. ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना आधार व प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नूरील भोसले यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे सचिव सचिन साळवी, सल्लागार ॲड. दिपक धिवर, विजय लोंढे, रवी साखरे, रवी सुरेकर, योगेश घोलप, शाळेचे मुख्याध्यापक चाबुकस्वार, प्रतिभा साठे, प्रसाद कुलकर्णी, सुरेखा शिंदे, कल्पना पिंपरकर, सुनीता चव्हाण, अलका शिदोरे, इंदुमती बोरुडे, यशवंत आमले, राजू चव्हाण, जया आठरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांचा रक्तगट तपासण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी काकासाहेब म्हस्के कामगार हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉ. किरण वैराळ, डॉ. वैष्णवी जगदाळे, डॉ. कुलदीप झावरे, डॉ. अंबिका कदम, डॉ. अंजली मनवर, लॅब टेक्निशीयन शबनम बागवान यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले. आभार सुरेखा शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.