निमगाव वाघा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार सौ. वसुधा देशपांडे यांचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या हरीभाऊ आपटे राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी सौ. वसुधा ज्ञानेश देशपांडे लिखित कामिनी – एक गूढ रहस्य या कादंबरीची निवड झाली आहे.
हा पुरस्कार 5 सप्टेंबर, शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वसुधा देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
सौ. वसुधा देशपांडे या ग्रंथालय शास्त्र विषयातील परीक्षा उत्तीर्ण असून, त्यांना साहित्याची विशेष आवड आहे. त्यांनी लिहिलेली कामिनी- एक गूढ रहस्यफ ही कादंबरी वाचकांना उत्कंठावर्धक आणि रहस्यमय विश्वात घेऊन जाते. याच कादंबरीला यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्राप्त झाला होता. साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश ठेवून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.