• Wed. Apr 16th, 2025

हरदिनचा रौप्य महोत्सव ठरणार आरोग्य-पर्यावरण चळवळीचा प्रेरणादायी उत्सव

ByMirror

Apr 7, 2025

अण्णा हजारे, पोपट पवार आणि आमदार संग्राम जगताप यांची राहणार उपस्थिती

25 वर्षाच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे होणार प्रकाशन

नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्ममभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपट पवार आणि आमदार संग्राम जगताप यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या 25 वर्षांपासून आरोग्य, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या या ग्रुपच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेऊन भविष्यातील सामाजिक वाटचाल ठरविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ग्रुपच्या 25 वर्षाच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे.


या अनुषंगाने हरदिन ग्रुपच्या प्रतिनिधींनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या विकास निधीतून भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या 15 लाख रुपयांच्या योग-प्राणायाम शेडच्या भूमिपूजनासह रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आमंत्रण दिले.


दरम्यान, राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे अण्णा हजारे आणि हिवरे बाजार (ता. नगर) येथे पोपट पवार यांची विशेष भेट घेऊन, गेल्या 25 वर्षात ग्रुपने केलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या स्मरणिकेची माहिती त्यांना सादर करण्यात आली. या स्मरणिकेचे प्रकाशन या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात होणार आहे.
भिंगार येथील बालपणाच्या आठवणी अण्णा हजारे यांनी या भेटीत उजाळल्या. त्यांच्या भिंगारमध्ये झालेल्या शालेय जीवनातील गप्पांनी प्रसंग रंगला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी अण्णांचा सत्कार केला. अण्णांनी हरदिन ग्रुपच्या कार्याचे कौतुक करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले.


पद्मश्री पोपट पवार यांनी देखील हरदिनच्या उपक्रमांशी आपले जुने नाते अधोरेखित करत, पर्यावरण व आरोग्यासाठी ग्रुप करत असलेले कार्य हे दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम सामाजिक, आरोग्य व पर्यावरण चळवळीचा जागर करणारा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रविंद्र कटारिया, सचिनशेठ चोपडा, जहीर सय्यद, रमेशराव वराडे, गणेश भोसले, सर्वेश सपकाळ, रतन मेहेत्रे, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, सुधीर कपाले, अशोक पराते, दीपक बडदे, सुभाष पेंढुरकर, अविनाश जाधव, प्रकाश देवळालीकर, विलास आहेर, अविनाश पोतदार आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *