• Fri. Feb 20th, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून स्वच्छता अभियान व वृक्षारोपणातून दिमाखात शिवजयंती साजरी

ByMirror

Feb 20, 2026

नागरिकांना मिठाईचे वाटप


महाराजांनी धैर्य, शौर्य व युक्तीद्वारे अशक्य वाटणारे स्वराज्य साकारले -पल्लवी विजयवंशी (मुख्य कार्यकारी अधिकारी)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे गुरुवारी (दि. 19 फेब्रुवारी) सकाळी स्वच्छता अभियान राबवून तसेच वृक्षारोपण करून शिवजयंतीला वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी व प्रांजली सपकाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रुपच्या सदस्यांनी हातात झाडू घेऊन जॉगिंग पार्क व परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणही करण्यात आले. संजय भिंगारदिवे व संजय सपकाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.


यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, संजय भिंगारदिवे, प्रांजली सपकाळ, सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, अविनाश पोतदार, सचिन चोपडा, ज्ञानेश्‍वर अनावडे, रवींद्र कटारिया, अभिजीत सपकाळ, सुभाष पेंढुरकर, सुंदरराव पाटील, अशोक पराते, रतन मेहेत्रे, विलास आहेर, आशिष पोतदार, अविनाश जाधव, दीपक अमृत, दीपक बडदे, प्रकाश देवळालीकर, जालिंदर अळकुटे, विनोद साळुंके, शेषराव पालवे, किरण फुलारी, राजू कांबळे, विनोद खोत, योगेश चौधरी आदींसह ग्रुपचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महापुरुषांच्या जयंती विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजऱ्या केल्या जातात. शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असून, महापुरुषांचे विचार आत्मसात करून ते कृतीत उतरवले तर समाजातील अनेक प्रश्‍न सुटू शकतात, असे त्यांनी नमूद केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा व दूरदृष्टीचा गौरव करताना सांगितले की, महाराज हे रयतेचे खरे राजे होते. राजमाता जिजाऊंनी बालवयातच दिलेल्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली आणि त्यांनी धैर्य, शौर्य व युक्तीद्वारे अशक्य वाटणारे स्वराज्य साकारले.


सीए रवींद्र कटारिया यांनी आपल्या भाषणात महाराजांनी प्रजेवर कधीही अन्याय होऊ दिला नाही, सर्वांना समान न्याय दिला, सर्वधर्मसमभाव व स्त्रियांप्रती आदराची भावना जपली, असे सांगितले. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सचिन चोपडा, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, संजय भिंगारदिवे, रमेश वराडे यांनीही आपल्या भाषणातून महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या पराक्रम, संस्कार व लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची माहिती दिली.


दरम्यान, ग्रुपचे सदस्य अविनाश पोतदार यांची कन्या असलेल्या भरत नाट्य अकॅडमीच्या संचालिका कु. आश्‍लेषा पोतदार यांनी भरतनाट्यम अलंकार परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *