• Tue. Apr 14th, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने फुले-आंबेडकर जयंती स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमाने साजरी

ByMirror

Apr 13, 2026

महापुरुषांच्या विचारांना वंदन करुन मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत


पर्यावरण संवर्धन हीच खरी मानवसेवा -डॉ. दमन काशीद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून एका गरजू मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन जयंती साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी संजय भिंगारदिवे व दीपक अमृत यांनी त्रिशरण आणि पंचशील घेतले. यानंतर डॉ. दमन काशीद व डॉ. गायत्री काशीद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रुपच्या सदस्यांनी उद्यान परिसरात स्वच्छता करत पर्यावरणाबाबत जागरूकतेचा संदेश दिला. महापुरुषांच्या विचारांना वंदन करुन मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने होतकरू विद्यार्थिनी गौरी बाळासाहेब नेटके हिला बी.ए. एम.एस. अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक मदत देण्यात आली.


या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, गायत्री कुलकर्णी, सारिका रघुवंशी, प्रांजली सपकाळ, मीनाताई परदेशी, ज्योतीताई भिंगारदिवे, कविता नेटके, अशोक पराते, ताराचंद ठोकळ, अनिल हळगावकर, विशाल भामरे, अभिजीत सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, प्रा. सारिका सूर्यवंशी, गायक महेश धावटे, सचिन परदेशी, प्रशांत बंडगर, मास्टर जावेद, बाळासाहेब नेटके आदींसह ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. दमन काशीद म्हणाले की, “निसर्गाचे संतुलन राखणे ही केवळ गरज नसून ती आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे, त्यामुळे वृक्षारोपणासारखे उपक्रम हे केवळ प्रतीकात्मक न राहता सातत्याने राबवले गेले पाहिजेत. समाजाच्या भल्यासाठी काम करताना पर्यावरणाचा विचार करणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय सपकाळ म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, शिक्षण आणि न्याय यांचा पाया रचला. त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते कृतीत उतरवणे गरजेचे आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपने आज स्वच्छता, वृक्षारोपण आणि शैक्षणिक मदत या माध्यमातून महापुरुषांच्या विचाराने समाजात कार्य उभे केले आहे. भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले.
प्रा. सारिका सूर्यवंशी म्हणाल्या की, समाजाच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचा उपक्रम हा खऱ्या अर्थाने महापुरुषांना अभिवादन करणारा ठरला आहे. जयंती म्हणजे केवळ उत्सव नसून त्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे ही खरी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सचिन चोपडा म्हणाले की, आजच्या काळात शिक्षण हेच व्यक्तीच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात, मात्र समाजाने पुढाकार घेऊन अशा विद्यार्थिनींना मदत करणे गरजेचे आहे. या उपक्रमातून एक सकारात्मक संदेश समाजात जात असल्याचे त्यांनी सांगितले.


कविता नेटके यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की, “मुलींच्या शिक्षणासाठी समाजाने केलेली ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे अनेक मुलींची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन म्हणून देत असलेले योगदान दिशादर्शक असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *