• Mon. Nov 3rd, 2025

भिंगारच्या विकास कामांसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे पालकमंत्री विखे यांना निवेदन

ByMirror

Oct 19, 2023

जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी हद्दीतील विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पालकमंत्री तथा महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली.


हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी पालकमंत्री विखे यांना निवेदन दिले. तर निधीची कमतरता असल्यामुळे छावणी परिषदच्या भिंगार हद्दीतील अनेक विकास कामे रखडली असून, सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याप्रकरणी लक्ष वेधले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, मेजर दिलीप ठोकळ, मनोहर दरवडे, संपत बेरड, सर्वेश सपकाळ, दीपक लिपाने, सुदाम गांधले, मारुती पवार, अमित खामकर, अक्षय नागापुरे, सिद्धार्थ आढाव, अभिजीत सपकाळ, अजिंक्य भिंगारदिवे, मतीन ठाकरे, ओंकार फिरोदे, संकेत झोडगे आदी उपस्थित होते.


शहराजवळ असलेल्या छावणी हद्दीतील भिंगारचे प्रश्‍न निधी नसल्याने प्रलंबीत आहेत. 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेल्या छावणी हद्दीतील नागरिक अनेक समस्यांना तोंड देत असून, काही प्रश्‍न आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने सोडविण्यात आले आहेत. या भागात रोकडेश्‍वर हनुमान मंदिर, गुरुद्वारा, राधाकृष्ण मंदिर व छावणी परिषदेचे भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क उद्यान आहे. या भागात शहरासह भिंगारमधील नागरिक दररोज फिरण्यास येतात. निधीची कमतरता असल्यामुळे कॅन्टोमेंटची कुठलीही विकास कामे होऊ शकलेली नाही. त्यामुळे नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागते.

येथील कामासाठी 50 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्यास महत्त्वाचे प्रश्‍न सुटणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर भिंगार शहराच्या विविध विकास कामासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *