आमी संघटनेचा उपक्रम
उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र त्यांच्या पाठिशी -अतुल दवंगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आमी संघटनेच्या वतीने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना सिबील स्कोर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. एमआयडीसी मधील चिंतामणी आर्ट गॅलरीत झालेल्या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी जिल्हा उद्योग केंद्राचा फायदा कसा करून घेता येईल व उद्योजक कसा मोठा होईल? यासाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
दवंगे म्हणाले की, जिल्हा उद्योग केंद्र उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योजकांसाठी शहरी व ग्रामीण असे दोन गट असून, ग्रामीण 25 टक्के व शहरी भागात 15 टक्के सबसिडी मिळत आहे. यामध्ये सामुहिक प्रोत्साहन योजना डी 50 टक्के, डी प्लस मध्ये 60 टक्के सबसिडी मिळते. या सबसिडीमुळे एमआयडीसी उद्योगाला मोठी चालना मिळेल. तसेच सरकारने निर्यातीवर सुध्दा सबसिडी चालू केली आहे. ही सबसिडी चालू करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र त्यांच्या पाठिशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बँक ऑफ बडोदाचे बँक मॅनेजर देविदास पालवे म्हणाले की, पंधरा वर्षापूर्वी एका बँकेकडे लोन घ्यायला गेले की, दहा बँकेची एनओसी घ्यावी लागत होती. परंतु आता तुमच्या आधार कार्ड नंबर टाकला की लोनची सर्व माहिती मिळते. कोणत्या बँकेचे कर्ज घेतले, त्याची परत फेड कशी केली? याची माहिती मिळते. सध्याची डिजीटल सिस्टीम खूप अपडेट झाली आहे. तुम्हाला कर्ज देण्या आगोदर तुमचा सिबिल स्कोर पहिले जाते. तो 750 च्या पुढे असावं लागतो. 2000 साली क्रेडिट इन्फेक्शन ही कंपनी स्थापन झाली. आज चाळीस लाख लोकांचा कर्जदारांचा 2004 सालापासून डेटा या कंपनीकडे आहे. सिबील स्कोर 14 दिवसामध्ये अपडेट होत असतो. 750 च्या वर सीबील स्कोर असेल, तर होम लोन, व्हेइकल लोण कमी टक्के पर्यंत बँक देते. क्रेडिट कार्डच्या ऑफर घेणे व वेळेत पैसे अदा न केल्यास दंड होऊन सिबील स्कोर खराब होत आहे. सिबील स्कोर वाढवायचा असेल, तर सोने तारण व मॉर्गेज लोनचा फायदा होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
औद्योगिक दृष्टया अविकसित व विकसनशील भागात मोठया प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक व्हावी व औद्योगिक विकासास चालना मिळावी या उद्देशाने राज्य शासन सन 1964 पासून सामुहिक प्रोत्साहन योजना राबवित आहे. योजनेमध्ये राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वेळोवेळी सुधारणा करण्यात येत असतात. नवीन उद्योजकांसाठी विविध शासकीय योजना, पूर्वीच्या वंचित उद्योग घटकासाठी सुरु झालेल्या योजना व नवीन पॉलिसीची या कार्यक्रमात माहिती देण्यात आली. तर सिबिल स्कोअर रेंज, क्रेडिट रेकॉर्ड म्हणजे काय? रिपोर्ट आणि स्कोअरमधील फरक, कंपनी सिबिल रेटिंग, सिबिल स्कोर कमी असताना लोन कसे मिळेल? या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी संघटनेच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष महेश इंदाणी, सागर निंबाळकर, प्रफुल्ल पारख, चिन्मय सुखटणकर, सतीश गवळी, सुमित लोढा, राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, मिलिंद कुलकर्णी, दिलीप अकोलकर, दौलत शिंदे, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.