भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये मासूम संस्थेचा उपक्रम
दिवसभर काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा व प्रोत्साहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणानंतर करिअरच्या विविध वाटा आणि रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मासूम संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसा विविध ठिकाणी काम करून रात्री शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना समाजात सक्षमपणे उभे करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला इयत्ता 8 वी ते 12 वीतील आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रात्रशाळेच्या चेअरमन ज्योतीताई कुलकर्णी होत्या. यावेळी मासूम संस्थेच्या सीनियर प्रोग्राम मॅनेजर गजाला शेख, प्लेसमेंट ऑफिसर अनुराधा पवार, इंडियन फॅशन अकॅडमीच्या संचलिका रचना काकडे, प्राचार्य व मासूम संस्थेचे सल्लागार सदस्य सुनिल सुसरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, रात्रशाळेतील विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने जिद्दीने मेहनत करत आहेत परंतु कौशल्याचे प्रमाणपत्र नसल्याने मेहनतीचे योग्य मानधन मिळत नसल्याने त्यांना कौशल्य व कौशल्याच्या प्रमाणपत्राचे महत्त्व सांगितले. दिवसभर काम करूनही शिक्षण घेण्याची त्यांची चिकाटी प्रेरणादायी आहे. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच आयुष्यात मोठे यश मिळवू शकतात. हा उपक्रम त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्राचार्य सुनिल सुसरे यांनी “रात्रशाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी दिशा देणारे केंद्र आहे. शिक्षणासोबतच कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती मिळणे आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे अशा मार्गदर्शन उपक्रमांचे महत्त्व अधिक असल्याचे ते म्हणाले.
गजाला शेख म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणावर न थांबता विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक प्रशिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि आत्मविश्वास या गोष्टी यशासाठी अत्यंत आवश्यक आहेत. मासूम संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी देत असल्याचे स्पष्ट केले. अनुराधा पवार यांनी “प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. योग्य मार्गदर्शन, कौशल्य आणि सातत्य याच्या जोरावर विद्यार्थी नोकरी तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी संधी ओळखून त्याचा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण, शासकीय योजना, तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मासूम संस्थेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या उपक्रमास संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, डायरेक्टर युवराज बोऱ्हाडे, कमलाकर माने, करिअर सेल प्रमुख स्नेहल ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, अनंत फडणीस, डॉ. रमेश झरकर, डॉ.पारस कोठारी आदी मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वृषाली साताळकर, अनुराधा दरेकर, बाळासाहेब गोरडे, शिवा शिंदे, कैलास करांडे, गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, अमोल कदम, मंगेश भुते, अशोक शिंदे, प्रशांत शिंदे, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी,संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे, उज्वला साठे, वैशाली दुराफे, स्वाती होले आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले व आभार प्रदर्शन संदेश पिपाडा यांनी मानले.
