बिबट्या घरवापसी आणि ग्लोबल वॉर्मिंग घरवापसी चळवळीची घोषणा
अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा पुढाकार
वृक्षारोपण, पाणीसाठवणूक आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा देण्यासाठीचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जलसंधारणासाठी सुरु केलेल्या कार्याला 50 वर्षे पूर्ण होत असताना सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णोमहोत्सवी अक्षय ओलाशय ही राष्ट्रीय मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर बिबट्या घरवापसी आणि ग्लोबल वॉर्मिंग घरवापसी ही राष्ट्रीय चळवळ जारी करण्यात आली आहे.
अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथे भेट घेऊन त्यांच्याशी झालेल्या सखोल विचारविनिमयानंतर ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीर बहादूर प्रजापती, दत्ता आवारी आणि संपत पोटे यांनी ही क्रांतिकारी चळवळ जाहीर केली आहे.
अण्णा हजारे यांनी त्यांच्या 50 वर्षांच्या पर्यावरण विषयक कार्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सुवर्णोमहोत्सवी अक्षय ओलाशय ही राष्ट्रीय मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच बिबट्या घरवापसी आणि ग्लोबल वॉर्मिंग घरवापसी या शीर्षकाच्या या राष्ट्रव्यापी उपक्रमामध्ये पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन आणि वनीकरणाच्या माध्यमातून जैवविविधता आणि निसर्गाचा समतोल पुनर्संचयित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, पाणीसाठवणूक आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा देण्यासाठीचा हा उपक्रम राहणार आहे.
रेन गेन बॅटरी तंत्रातून जमिनीखाली पावसाचे पाणी साठवण्याची वैज्ञानिक आणि परवडणारी पद्धत. यामुळे वर्षभर जमिनीतील ओलावा टिकवून ठेवता येतो. धनराई मॉडेलद्वारे कोरड्या आणि नापीक जमिनींना पुन्हा उपजाऊ बनवण्याचा उपक्रम. या तंत्राने फायदेशीर फळे आणि औषधी वृक्षांची लागवड शक्य होते. प्रत्येकजण, अण्णा व्हा: अण्णा हजारे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची प्रेरणा घेऊन प्रत्येक नागरिकाने पर्यावरण पुनरुज्जीवनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन या चळवळीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
चळवळीचे ध्वज व त्याचे प्रतीक जाहीर करण्यात आले आहे. 5 फूट लांब आणि 3 फूट रुंद असणार असून, त्याच्या पांढऱ्या कापडाच्या मध्यभागी निळ्या रंगाचा पृथ्वीचा गोल असेल. पांढरा रंग शुद्धता, प्रामाणिकपणा आणि नीतिमूल्यांचे प्रतीक. तर निळा पृथ्वीगोल: पर्यावरण संरक्षणाचा जागतिक संदेश देणारा असणार आहे.
ही चळवळ केवळ बिबट्यांचे पुनर्वसन किंवा तापमानवाढीविरोधातील संघर्ष नाही, तर ती एका जागरूक, निसर्गाशी सुसंवादी जीवनशैलीचा पुनर्विचार आणि पुर्नप्रारंभ आहे. या चळवळीत सहभागी होवून आपल्या भावी पिढीचे भवितव्य उज्वल करण्याचे म्हंटले आहे.