पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्यक -उपसरपंच किरण जाधव
नगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
निमगाव वाघाचे नवनिर्वाचित उपसरपंच किरण जाधव यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, संचालक अतुल फलके, मेजर अंकुश शिंदे, बाळू फळके, हुसेन शेख, वैभव पवार, संदीप गायकवाड, पिंटू जाधव, रितेश डोंगरे, अरुण कापसे, सागर केदार, विजय जाधव आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण जाधव म्हणाले की, आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आरोग्य सेवेतून एखाद्याचे जीव वाचविण्याचे समाधान मिळते. ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्यक आहे. गंभीर आजार झाल्यावर नागरिक औषधोपचारासाठी धावतात. मात्र वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. वेळोवेळी तपासणीला पैसे नसल्याने इच्छा असताना देखील सर्वसामान्य घटकातील ग्रामस्थांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलच्या सहकार्याने ग्रामीण भागात हे शिबिर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे यांनी महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटल मधील खर्चिक आरोग्य सुविधा घेणे परवडत नाही. भविष्यातील गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्यक असून, यासाठी शिबिराचा लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात नागरिकांची दंत तपासणी, मधुमेह, रक्तदाब, नेत्र, कान, नाक, घसा आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. डॉ. गणपत वसावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करुन सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू घटकांना मोफत व अल्पदरात आरोग्य सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती दिली. या शिबिरात किमान दोनशे पेक्षा जास्त नागरिकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करुन त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी साजन शेंडे, समुपदेशक गौरी लोणारे, लॅब टेक्निशियन वैशाली पंडोरे, विनायक महाले, विशाल खताडे, प्रमोद दळवी, शुभम भोर आदींनी परिश्रम घेतले.