आरोग्य सेवा आणि भक्तिभावाचे अनोखे संगम
आरोग्य सेवा ही देखील ईश्वर सेवाच -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- भिंगार, सौरभ नगर येथील श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत स्नेहालय संचलित केरिंग फ्रेंड हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने कै. रमेश राजाराम मडावी यांच्या स्मरणार्थ भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला. यंदा सप्ताहाचे 30 वे वर्ष होते.
आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर ह.भ.प. रेखाताई मडावी, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ, मनोज देशपांडे, साजन शेंडे, डॉ. गणपत वसावे, डॉ. अतुल मडावी, पूजा मडावी, श्रध्दा गायकवाड, शितल धोंगडे, ह.भ.प. अनावडे महाराज आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

रेखाताई मडावी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, धार्मिक कार्यक्रमासह आरोग्यसेवेचा उपक्रम जोडल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबद्दलची जागरूकता वाढते. स्वतःहून तपासणी न करणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबिर आधार ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावरच त्याचे आयुष्य आणि समाजाची उन्नती अवलंबून असते. त्यामुळे अशी आरोग्य शिबिरे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाला नवसंजीवनी देणारा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले.
संजय सपकाळ म्हणाले की, आरोग्य सेवा ही देखील ईश्वर सेवाच आहे. गंभीर आजार होण्यापूर्वीच विविध तपासणी करुन ते आजार ओळखणे गरजेचे आहे. वेळेवर तपासणी केल्यास गंभीर आजारांपासून बचाव होतो. अशा उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आरोग्यसेवेचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात शारीरिक तपासणी, नेत्र तपासणी, कान-नाक तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने महिलांची आरोग्य तपासणी, बालकांची तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर प्रमाण, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत औषध वाटपही करण्यात आले.
या सप्ताहात ह.भ.प. मुक्ताई महाराज धाडगे, संगीताताई कापसे, पूजाताई अळकुटे-माने, शंकर महाराज गणगे भक्तीमय वातावरणात कीर्तन झाले. ह.भ.प. विलास महाराज मदने यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची भक्तिमय सांगता झाली. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. सुहास ढोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ संगीतालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तबलावादन जुगलबंदीने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
हा धार्मिक सोहळा व आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मडावी परिवार, ह.भ.प. ऋषिकेश महाराज कराळे, अनिताताई सुडके, मायाताई गोरखा, रामेश्वर महाराज वाघमोडे, म्हस्के सर, कांबळे महाराज, गीता सत्संग मंडळ, तपेश्वर भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, ओंकार भजनी मंडळ, श्री साई सोहम परिवार, श्री साईबाबा मंदिर राधानगरी, साईदास परिवार, भृंगऋषी भजनी मंडळ, हरी ओम माऊली भजनी मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.