निरोगी आरोग्यासाठी महिलांना आहार, व्यायामबद्दल मार्गदर्शन
बदलती जीवनशैली, वाढता तणाव, चूकीच्या आहाराने महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम -डॉ. रितुजा डुबेपाटील
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेच्या माध्यमातून प्रगती फाउंडेशनच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर महिलांना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बालिकाश्रम रोड येथे झालेल्या या शिबिराचा महिलांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.
डॉ. रितुजा श्रीकांत डुबेपाटील यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. यावेळी प्रगती फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी वाघ, स्वाती संतोष हराळे, बालमनी पोता, अंबिका पोता, अंजू शेंडगे, अनुष्का पोता, उज्वला ढोमणे, सुशीला मिसाळ, साक्षी साळवे, अनिता मिसाळ, चंद्रकला गायकवाड, रूपाली धेंड, ज्योती अरगडे, अलका शेटे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. रितुजा डुबेपाटील म्हणाल्या की, स्त्री ही सृजनाची मूळ शक्ती असून तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याचे भवितव्य अवलंबून असते. बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहारातील बिघाड यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. महिला वर्ग कुटुंबाच्या व्यस्त कामात आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. तर आहार, व्यायामबद्दल मार्गदर्शन केले.
अश्विनी वाघ यांनी प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी कार्य सुरु आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहिल्यास कुटुंबातील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तर महिलांच्या निरोगी जीवनासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थितांचे आभार अनिता मिसाळ यांनी मानले. या शिबिरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.