पार्वतीबाई सुखदेव वेताळ संस्थेचा 253 वा शिबिर
19 रुग्णांवर होणार मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया
दृष्टी म्हणजे जीवनाचा प्रकाश -चारुदत्त वाघ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचे डोळे तपासण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जवखेडे खालसाच्या उपसरपंच सौ. कोसाबाई केरू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच चारुदत्त वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराचे संयोजक मेजर शिवाजी वेताळ यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचे ध्येय नेहमीच समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी योगदान देण्याचे राहिले आहे. आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून 250 हून अधिक शिबिरे घेण्यात आली असून, लाखो दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना नवदृष्टी देण्याचे कार्य करण्यात आले आहे. नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे केवळ वैद्यकीय साहाय्य नसून, गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद आणि आत्मविश्वास निर्माण करणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच चारुदत्त वाघ म्हणाले की, पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचा हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दृष्टी म्हणजे जीवनाचा खरा प्रकाश असून, एखाद्याचे डोळे वाचविणे म्हणजे त्याला नवे जीवन देण्यासारखे आहे. संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यविषयक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, 253 वे शिबिर म्हणजे समाजसेवेतील एक मोठे योगदान आहे. या उपक्रमामुळे सामान्य माणसाला मोठा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपसरपंच सौ. कोसाबाई केरू जाधव यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी संस्थेला नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. या शिबिरात डॉ. कोरडे मॅडम यांनी उपस्थितांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. के.के. आय. बुधरानी हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या 253 व्या शिबिरामध्ये एकूण 122 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 19 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
