पार्वतीबाई वेताळ संस्थेचा उपक्रम; 22 रूग्णांवर होणार मोफत मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया
ग्रामीण भागासाठी संस्थेचा संवेदनशील दृष्टिकोन कौतुकास्पद -चारुदत्त वाघ
नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर मोफत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी कार्यरत असलेल्या पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबीराचे उद्घाटन ॲड. वैभव आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत ॲड. स्नेहा वेताळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संरपच चारुदत्त वाघ हे होते. प्रास्ताविकात मेजर शिवाजी वेताळ म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकरी व गोर-गरीब वर्गाला महागडे आरोग्य सुविधांचा खर्च पेलवत नाही. संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या दारा पर्यंत मोफत आरोग्य सुविधा घेऊन जाण्याच्या उद्देशाने कार्य सुरु आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू घटकांना नवदृष्टी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संरपच चारुदत्त वाघ म्हणाले की, आजही अनेक ग्रामीण ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर नेत्र विकारांची निदान व उपचार मिळत नाहीत. अशा शिबिरामुळे त्यांच्या जीवनात नवा प्रकाश येतो. केवळ मोफत सेवा नाही, तर या उपक्रमामागे असलेला संवेदनशील दृष्टिकोन खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. वैभव आंधळे यांनी सातत्याने सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराला पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलचे सहकार्य मिळाले. संस्थेच्या वतीने घेण्यात आलेले हे 248 वे शिबिर होते. या शिबिरामध्ये 162 रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. 22 रूग्णांवर के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.