कचरा वेचक, बांधकाम मजूर व इतर कष्टकरी वर्गाला आरोग्य शिबिरांचा आधार
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागातील कचरा वेचक, बांधकाम मजूर व इतर कष्टकरी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अंजली चष्मावाला आणि थोरात सुपर स्पेशालिटी आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला कष्टकरी वर्गातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे शिबिर माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे, इलियास शेख, संपत शिंदे, विकास घाडगे, विकास वाल्हेकर, सोमनाथ लोखंडे, दिलीप शिंदे, मयूर उडानशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
विकास उडाणशिवे म्हणाले की, रामवाडी ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून येथे कष्टकरी, कचरावेचक व बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. दैनंदिन श्रमांतून पोटाची गरज भागवणाऱ्या या वर्गाला आरोग्याकडे दुर्लक्ष करावे लागते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दवाखान्याचा खर्च त्यांना परवडत नाही. म्हणूनच अशा आरोग्य शिबिरांची त्यांना गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी अत्याधुनिक मशिनद्वारे करण्यात आली. गरजू रुग्णांवर अल्पदरात मोतीबिंदू, काचबिंदू आणि तिरळेपणा अशा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच अल्पदरात नंबरचे चष्मे वाटप करून अनेकांना दिलासा देण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. रोहित थोरात, रामेश्वर सोलाट, भूषण जाधव आणि संपत शिंदे यांनी सहकार्य केले.