87 शिबीरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया
आई-वडिलांमध्ये देव पाहून त्यांची सेवा करावी -प्रा. माणिक विधाते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराला अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन शहर बँकेचे व्हॉईस चेअरमन प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते झाले. ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. विशाल घंगाळे, विठ्ठल राहिंज, बाबा धीवर, अशोक मिसाळ आदींसह ग्रामस्थ व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आई-वडिलांमध्ये देव पहावा. मंदिर-मस्जिदात देव पाहण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांच्या सेवेत देव पहावा. फिनिक्स सोशल फाऊंडेशन सर्वसामान्य वर्गातील दृष्टीहीनांसाठी देवदूत ठरले आहे. या चळवळीच्या 34 वर्षाच्या खडतर प्रवासात अनेक अडचणींवर मात करुन नेत्रदानाची मोठी सामाजिक चळवळ जालिंदर बोरुडे यांनी उभी केल्याचे त्यांनी सांगितले.
नेताजी भाबड म्हणाले की, 34 वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या गरजूंना नवदृष्टी देण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे. या चळवळीच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या गरजू घटकांना आधार मिळत आहे. फिनिक्सचे कार्य हे ईश्वरी कार्य असून, यातून मनुष्यसेवा घडत आहे. या कार्यासाठी सर्वपरीने सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी, शेतकरी व गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टीदोष दूर करुन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशन करत आहे. सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण-उत्सव फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरे करुन दर महिन्याला या शिबिराचे आयोजन केले जाते. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहर बँकेच्या व्हॉईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार करण्यात आला. नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाबची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 390 रुग्णांची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. 87 शिबीरार्थींवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, राजेंद्र बोरुडे, ओम बोरुडे, सौरभ बोरुडे, विशाल भिंगारदिवे यांनी परिश्रम घेतले.
