• Wed. Oct 15th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या दंतरोग तपासणी शिबिरात 150 रुग्णांची मोफत तपासणी

ByMirror

Jan 4, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सामाजिक कार्याची प्रचिती देशभर -अरविंद दुगड

अत्यल्प दरात रुग्णांवर होणार दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार

नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांना आरोग्यसेवेसाठी आधार ठरलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य देशभरात पसरले आहे. कोलकत्ता येथे देखील या हॉस्पिटलच्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली. प.पू. आनंदऋषीजी महाराजांच्या आशिर्वादाने येथील प्रत्यक्ष सामाजिक कार्य पाहण्याचा योग आला. विविध आजाराने ग्रासलेल्यांचे जीवन वेदनामुक्त होण्यासाठी माणुसकीच्या भावनेने सुरु असलेल्या आरोग्यसेवेच्या कार्याने भारावल्याची भावना कोलकत्ता येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद दुगड यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कोलकत्ता येथून आलेल्या दुगड परिवाराच्या वतीने आयोजित मोफत दंतरोग तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अरविंद दुगड बोलत होते. याप्रसंगी सुषमा दुगड, पुनीत दुगड, सतीश बोथरा, प्रतिभा बोथरा, गौरव बोथरा, डॉ. वसंत कटारिया, संतोष बोथरा, सीए आयपी अजय मुथा, सतीश लोढा, निखिलेंद्र लोढा, डॉ. आशिष भंडारी, सुनिल मालू, श्रेयश कांकरिया, सुमित लोढा, प्रकाश छल्लाणी, दंतरोग तज्ञ डॉ. प्राची गांधी, डॉ. अपर्णा पवार आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये असलेला अद्यावत कार्डियाक विभाग आरोग्यसेवेचा आधार असून, कॅथलॅब देशातील सर्वोत्कृष्ट कॅथलॅब म्हणून नावरुपास आली आहे. डायलेसिसच्या माध्यमातून रुग्णांना उत्कृष्ट व मोफत सुविधा प्रदान केली जात आहे. हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन, एमआरआय आदी खर्चिक आरोग्य चाचण्या अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर समाजासाठी सेवाभावाने कार्य सुरू आहे. यासाठी देणगीदारांचा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


संतोष बोथरा म्हणाले की, आरोग्य सेवेतून समाज सदृढ करण्याबरोबरच अद्यावत शिक्षणाने सशक्त भावी पिढी घडविण्यासाठी वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी उभारली जात आहे. दुगड परिवाराचे कोलकत्ता मध्ये मोठे सामाजिक योगदान सुरु आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन ते भेटीसाठी आले आहे. देशभरात हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याची महती सर्वत्र पसरत असताना अभिमान वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्राची गांधी यांनी दात सफाई करण्याबरोबर सर्व सुविधा व उपचार हॉस्पिटलच्या दंत विभागात उपलब्ध आहेत. सुपर स्पेशालिटी तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी सज्ज आहे. अत्यल्प दरात रुग्णांना दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार पध्दतीची सेवा मिळत आहे. दर शनिवारी दंत रोग विभागाची ओपीडीची मोफत व इतर वेळेस सवलत दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


दंतरोग तपासणी शिबिरात 150 रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. दंतरोग तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची दंत तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये मेटलकॅप, सिरॅमिक कॅप, रुट कॅनल, दातांची कवळी बसविणे, दात साफ करणे व दातांमध्ये सिमेंट भरणे आदी उपचार अल्पदरात उपचार करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार निखिलेंद्र लोढा यांनी मानले. कोलकत्ता येथील दुगड परिवाराने हॉस्पिटलच्या विविध विभागाची पहाणी करुन सुरु असलेल्या आरोग्यसेवेचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *