दीन-दुबळ्या रुग्णांना नवजीवन देण्याचे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य देवदूताप्रमाणे -सुभाष मुनोत
गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे डॉक्टरांचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे कार्य देवदूताप्रमाणे करीत आहे. प.पू. आनंदऋषीजी महाराजांच्या विचाराने सेवाभाव हे ध्येय समोर ठेऊन आदर्शऋषीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. दर महिन्याला होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिरातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जात असल्याचे प्रतिपादन सुभाष मुनोत यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुभाष मुनोत व मुनोत परिवाराच्या वतीने आयोजित मूत्रविकार तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मुनोत बोलत होते. यावेळी सौ. अलका मुनोत, सीए शांतीलाल मुनोत, ज्योती मुनोत, राजेंद्र मुनोत, चंद्रकला मुथा, संजय कटारिया, योगेश मुनोत, पारस मुनोत, शीतल मुनोत, स्मिता मुनोत, प्रकाश गांधी, संजय गांधी, मूत्रविकार तज्ञ डॉ. संकेत काळपांडे, डॉ. अमेय सांगळे, डॉ. स्वनित देशपांडे, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश लोढा, डॉ. वसंत कटारिया, निखीलेंद्र लोढा, मानकचंद कटारिया, अभय गुगळे, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, राज्यातील एक अद्यावत हॉस्पिटल म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलने नावलौकिक मिळवला आहे. हॉस्पिटल पर्यंत पोहचू न शकणारे बीड व अहमदनगर जिल्ह्यातील दुर्बल घटकांना वाडी-वस्तीवर जाऊन हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा पुरवली जात आहे. हॉस्पिटलची स्थापना करतानाच सेवाभाव हा उद्देश समोर ठेऊन आजपर्यंत रुग्णसेवेचा वसा जोपासला जात आहे. सुभाष मुनोत व परिवाराचे आचार्यजींवर नितांत श्रध्दा असून, ते हॉस्पिटलच्या सेवाकार्यात नेहमीच योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र मुनोत यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे मोफत शिबिर सर्वसामान्य घटकांना आधार देत आहे. एका छताखाली सर्व आरोग्य सेवा मिळत असल्याने सर्वसामान्यांना याचा लाभ घेणे शक्य होत असून, या रुग्णसेवेतून निरोगी समाज घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
मूत्रविकार तज्ञ डॉ. संकेत काळपांडे म्हणाले की, मूत्रविकारच्या सर्व शस्त्रक्रियांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत मशिनरी, दुर्बीण व अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहे. माफक दरात या सेवा दिल्या जात असून, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हे उपचार मोफत होत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमेय सांगळे यांनी मूत्रविकार, पोटात दुखणे, लघवीचे त्रास अंगावर न काढता तातडीने प्राथमिक तपासणी करण्याचे आवाहन केले. डॉ. स्वनित देशपांडे यांनी आरोग्याच्या लहान समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास, गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी काही त्रास जाणवल्यास तातडीने तपासणी करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी प्रोस्टेट रोग उपचार, युरेथ्रल स्ट्रीचर रोग व्यवस्थापन, पुरुष वंध्यत्व समुपदेशन, मूल्यमापन आणि व्यवस्थापन, महिलांचे मूत्र मार्गातील विकार, मूत्रमार्ग, मुत्राशय, प्रोस्टेट, पुरुषांचे जननेंद्रिय, अंडाशय कर्करोग व्यवस्थापन आदी संदर्भात 110 रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.