• Tue. Dec 30th, 2025

1 जानेवारीला शहरात मुळव्याध, भगंदरसह विविध आजारांवर मोफत तपासणी

ByMirror

Dec 30, 2025

निष्णात तज्ञ डॉक्टरांची राहणार उपस्थिती; गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी मोहिनी चॅरिटेबल ट्रस्ट, जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगर, योगदान (डॉ. पुंड) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व शुभम आयुर्वेदालय यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जानेवारी रोजी मोफत तपासणी व अल्पदरात क्षारसूत्र (शस्त्रकर्म) ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाची आरोग्यदायी भेट म्हणून हे शिबिर सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी मोठी संधी ठरणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


हे शिबिर योगदान (डॉ. पुंड) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुष्कराज पॅलेस, बागडेमळा, बालिकाश्रम रोड येथे होणार आहे. या शिबिरात मुळव्याध, भगंदर, हायड्रोसिल, हर्निया, सुंता (Circumcision), स्तनातील गाठी तसेच शरीरावरील विविध गाठी यांची मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्‍यकतेनुसार लेझर थेरपी, क्षारसूत्र थेरपी व शस्त्रक्रिया (ऑपरेशन) अल्पदरात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुश्रुत संजय पुंड, डॉ. संजय पुंड, जायंट्सचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अनिल गांधी, डॉ. विनय शहा यांनी दिली आहे.


विशेष म्हणजे या आधुनिक व सुरक्षित चिकित्सा पद्धतीमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल राहण्याची गरज नसते. शौचक्रियेचे नैसर्गिक नियंत्रण अबाधित राहते तसेच ऑपरेशननंतर रुग्ण आपल्या दैनंदिन कामकाजात नियमितपणे सहभागी होऊ शकतो. त्यामुळे मुळव्याध व भगंदरसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे.


या शिबिरात निष्णात व अनुभवी तज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करणार असून त्यामध्ये डॉ. सुश्रुत संजय पुंड, डॉ. संजय पुंड, डॉ. रजनिकांत पुंड, डॉ. शरद ठुबे, डॉ. सौ. मनिषा संजय पुंड यांचा समावेश आहे. तसेच डॉ. सौ. मनिषा संजय पुंड, डॉ. संगीता कुलकर्णी (भुलतज्ञ) व सौ. योगिता पुंड या महिला रुग्णांची विशेष तपासणी करणार आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित तपासणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या शिबिरासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक असून इच्छुक व गरजू रुग्णांनी डॉ. सौ. मनिषा संजय पुंड यांच्याशी 9822316642, 7350128708 या नंबरवर संपर्क साधावा. नेवासा, श्रीरामपूर व शेवगाव येथील रुग्णांनी नावनोंदणीसाठी डॉ. रजनिकांत पुंड यांच्याशी 9421334528 या नंबरवर संपर्क साधावा. ज्या रुग्णांना डायबेटीस, रक्तदाब (बी.पी.) किंवा थायरॉईड यांसारखे आजार आहेत, त्यांनी आपल्या रक्त, लघवी व इतर तपासण्यांचे सर्व अहवाल व कागदपत्रे सोबत आणावीत, असे सांगण्यात आले आहे. 31 डिसेंबर 2025 पूर्वी नोंदणी केलेल्या रुग्णांचाच ऑपरेशन शिबिरात समावेश करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *