• Thu. Mar 13th, 2025

आनंदऋषीजी नेत्रालयात दृष्टीदोष असलेल्या बालकांच्या मोफत तपासण्या

ByMirror

Feb 23, 2025

तिरळेपणा, अल्प दृष्टी, जन्मजात मोतिबिंदू, पापणी लवण्याच्या समस्यांवर करण्यात आले निदान; शिबिराला जिल्ह्यातून उत्सफूर्त प्रतिसाद

आनंदऋषीजी हॉस्पिटल दुर्बल घटकांच्या जीवन आरोग्यसेवेने प्रकाशमान करत आहे -राजकुमार छाजेड

नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल दुर्बल घटकांच्या जीवन आरोग्यसेवेने प्रकाशमान करत आहे. सर्व आरोग्य सुविधा एका छताखाली देत असताना, दृष्टीदोष असलेल्यांना देखील नेत्रालय विभागाचा आधार मिळत आहे. लहान मुलांमध्ये दृष्टीदोष निर्माण झाल्यास यांचे भवितव्य अंधकारमय बनते. अशा लहान मुलांमधील दृष्टीदोष दूर करुन त्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीकोनाने हे शिबिर घेण्यात आले. या सेवा कार्याच्या संधीतून समाधान मिळत असल्याची भावना पुणे येथील राजकुमार छाजेड यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालय येथे स्व. सौ. प्रमिलाबाई राजकुमारजी छाजेड (पुणे) यांच्या स्मरणार्थ छाजेड परिवाराच्या वतीने आयोजित बाल नेत्र चिकित्सा व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी राजकुमार छाजेड बोलत होते. यावेळी अशोककुमार छाजेड, सुनिल छाजेड, सौ. भावना छाजेड, सौ. समता छाजेड, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रकल्पाचे समन्वयक डॉ. विजय दळवी, जैन सोशल फेडरेशनचे सुनिल मालू, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, मेडिकल डायरेक्टर डॉ. अशोक महाडिक, बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. विमल राजपूत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ. संपदा मिरीकर आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात आनंद छाजेड म्हणाले की, मागील 7 वर्षांपासून आनंदऋषीजी नेत्रालयात 92 हजार ऑपरेशन यशस्वी करण्यात आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात जाऊन दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना नवदृष्टी देण्याचे काम केले जात आहे. दुर्गम भागात वाड्या-वस्तीवर जाऊन तेथील दृष्टीदोष असलेल्या दुर्बल घटकातील रुग्णांना हॉस्पिटल मध्ये आणून दोन दिवस त्यांच्या राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करुन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच लहान मुलांमधील दृष्टीदोष निर्मूलनासाठी नेत्रालयाने पुढाकार घेतलेला आहे. लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढत असून, हे दृष्टीदोष लवकर लक्षात येत नाही. यासाठी पालकांनी देखील जागरूक राहण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यात नेत्रालयाच्या माध्यमातून मनपा व जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देऊन आवश्‍यकतेनूसार शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. अशोक महाडिक यांनी लहान मुलांचे अंधत्व वेगवेगळे असतात, त्यांचे दृष्टीदोष लवकर लक्षात येत नाही. सक्षम समाजासाठी व मुलांच्या भवितव्यासाठी नेत्रालयाने पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून छाजेड परिवाराने केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. वयाच्या आठ वर्षानंतर दृष्टीदोष लक्षात येतो, डोळ्यांचे कॅन्सर असलेले मुले देखील आढळत आहे. यासाठी वेळोवेळी पालकांनी तपासणी करणे आवश्‍यक आहे. सुदृढ आरोग्य व निरोगी दृष्टी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. विजय दळवी म्हणाले की, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात आनंदऋषी हॉस्पिटलचे मोठे सहकार्य लाभत आहे. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी नेत्रालय विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2017 पासून ते 2025 पर्यंत नेत्रदोष असलेल्या 450 पेक्षा अधिक बालकांवर या विभागाच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नेत्र शिबिर घेऊन अडीच हजार पेक्षा जास्त मुलांचे स्क्रीनिंग करण्यात आले. तर गरजूंना मोफत चष्मे व नेत्रदोषाचे विविध शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


सुनील छाजेड यांनी सशक्त पिढी घडविण्यासाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. आजची मुले ही आपल्या देशाचा भविष्य आहे. दृष्टीदोष असलेल्या लहान मुलांच्या नेत्रतपासणी व उपचारासाठी छाजेड परिवाराने निस्वार्थपणे आणि सेवाभावाने हातभार लावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते शिबिराचे आयोजक छाजेड परिवाराचा सत्कार करण्यात आला. नेत्रालयाच्या माध्यमातून जिल्हाभर शालेय स्तरावर राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणीसाठी विशेष योगदान देणारे राजेंद्र गायकवाड व कमल गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबिरात डोळ्यांचा तिरळेपणा, अल्प दृष्टी, जन्मजात मोतिबिंदू, पापणी लवणे आदी विकारांची तपासणी बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. विमल राजपूत यांनी केली. दिवसभर चाललेल्या या शिबिरात शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या 110 बालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 25 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. बाल नेत्र रुग्णांना मोफत चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *