आपल्या वाट्याला आलेले दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये -राजेंद्र बलदोटा
स्वत:च्या दु:खातून प्रेरणा घेऊन इतरांना नवजीवन देण्यासाठी बलदोटा परिवाराचा पुढाकार
नगर (प्रतिनिधी)- आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले दु:ख व आजार इतरांच्या वाट्याला येऊ नये, या सामाजिक संवेदनेने सर्वसामान्यांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले. वेळीच कॅन्सरचे निदान व उपचार झाल्यास त्या रुग्णाला पुन्हा नवजीवन मिळते. दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करत आहे. या रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे प्रतिपादन राजेंद्र बलदोटा यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. ललीता राजेंद्र बलदोटा यांच्या स्मरणार्थ बलदोटा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी राजेंद्र बलदोटा बोलत होते. यावेळी दिलीप संचेती, सुमतीलाल बलदोटा, अभय संचेती, आकाश संचेती, सचिन भंडारी, हेमलता संचेती, कल्पना संचेती, प्राजक्ता बलदोटा, प्रिशा बलदोटा, मनिषा शिंगवी, महावीर शिंगवी, मयूर शिंगवी, सचिन कटारिया, स्नेहा शिंगवी, अविनाश साळुंके, संजय लोढा, स्वप्निल गांधी, अजित कर्नावट, राजेंद्र ताथेड, मनिषा लोढा, अक्षय भंडारी, शरद डोंगरे, सुजय गांधी, श्रेयस कोठारी, राजू छल्लाणी, संतोष बोथरा, सतीश लोढा, माणकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, कॅन्सर सर्जन डॉ. अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, कर्माचे सिद्धांत कसे चांगले करता येईल व दुःखातून सावरून इतरांना आधार देण्यासाठी बलदोटा परिवराने एक वेगळा पायंडा समाजात पाडला आहे. सर्वांच्या सद्भावना व सहयोगाने आरोग्य मंदिराचे कार्य सुरू असून, बलदोटा परिवाराचे देखील यामध्ये योगदान लाभत आहे. हॉस्पिटलची दर्जेदार सेवा, अद्यावत सोयी-सुविधांमुळे हॉस्पिटलचे संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अनिकेत शिंदे म्हणाले की, कॅन्सरमध्ये तोंड, छाती व पोटातील आतड्यांचे आदी विविध कॅन्सरचे प्रकार आहेत. सर्व प्रकारच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत यंत्रसामग्री व तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून यशस्वीपणे होत आहे. मागील 9 महिन्यात तब्बल 150 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी सुरू करण्यात आलेली असून, येणाऱ्या काळात रुग्णांसाठी रेडिएशन देखील सुरू केले जाणार आहे. एका छताखाली कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आकाश संचेती म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आधार बनला आहे. येथे दर महिन्याला कॅन्सरच्या मोठ्या प्रमाणात सर्जरी होत असून, ही कौतुकास्पद बाब आहे. कॅन्सरने आपल्या कुटुंबातील व्यक्ती दगावला, हे दु:ख इतरांना मिळू नये या उद्देशाने घेण्यात आलेले शिबिर प्रेरणादायी आहे.
प्राजक्ता बलदोटा यांनी कॅन्सरबाबत समाजामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. ज्या आजाराने घरातील व्यक्ती दगावला त्या आजाराने आनखी कोणाच्या घरातील व्यक्ती दगावू नये या भावनेने कॅन्सरवर मात करण्यासाठी हे शिबिर आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पिकवलेल्या अन्नातून देखील कॅन्सर झपाट्याने वाढत आहे. कॅन्सरचे लक्षणे आढळल्यास नागरिकांना वेळोवेळी तपासणी करण्याचे त्यांनी आवाहन केले. योग्य वेळी निदान व योग्य उपचार झाल्यास कॅन्सर पूर्णतः बरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात 80 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच कॅन्सरच्या तपासण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.