अहिल्यानगर शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्विकारली पदाची सूत्रे
बालरोग तज्ञ भारताच्या भावी पिढीचे आरोग्य जपण्याचे काम करत आहे -डॉ. अमोल पवार
नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचा स्थापना दिन अहिल्यानगर शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. भारतीय बालरोग तज्ञ संघटना अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख, सचिव उज्वला शिरसाठ व खजिनदार डॉ. संदीप गायकवाड यांनी पदाची सूत्रे स्विकारली.
भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे भारतीय बाल रोग तज्ञ संघटनेचे समन्वयक डॉ. अमोल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महाराष्ट्र बाल रोग तज्ञ संघटनेचे खजिनदार डॉ. रविंद्र सोनवणे, डॉ. सुचित तांबोळी, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. श्याम तारडे, डॉ. सागर वाघ, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. अनिल कुऱ्हाडे, डॉ. सुभाष फिरोदिया, डॉ. दिपक कर्पे, डॉ. रामदास बांगर, डॉ. प्रताप पटारे, डॉ. मकरंद धर्मा, डॉ. गणेश माने, डॉ. सचिन सोलट आदींसह शहरातील बालरोग तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पेडियाट्रिक हेपॅटोलॉजी इन इंडिया: ए जर्नी ऑफ इनोवेशन ॲण्ड एक्सलन्स या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. अमोल पवार यांनी बालरोग तज्ञ भारताच्या भावी पिढीचे आरोग्य जपण्याचे काम करत असून, भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी योगदान देत असल्याचे सांगितले.
डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी बालकांच्या आरोग्यासाठी भारतीय बालरोग तज्ञ संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, या चळवळीतून सशक्त भारताची निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. रविंद्र सोनवणे यांच्यासह उपस्थित ज्येष्ठ बालरोग तज्ञ यांनी बालकांचे विविध आजार व अद्यावत उपाचर पध्दती यावर मनोगत व्यक्त केले.
नूतन अध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख यांनी संघटनेच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सचिव उज्वला शिरसाठ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. खजिनदार डॉ. संदीप गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.