फुटबॉल क्षेत्रातील योगदान व कर्तृत्वाबद्दल उंच माझा झोका पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या व एटी फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांच्या शिरपेचात झी मराठी वाहिनीने मानाचा तुरा रोवला आहे. स्त्री कर्तुत्वाचा सन्मानातंर्गत तुरंबेकर यांनी फुटबॉल क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना उंच माझा झोका या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात तुरंबेकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. फुटबॉल क्षेत्रामध्ये केलेली अतुलनीय कामगिरी आणि एटी फाऊंडेशन व अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागात फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी, तसेच क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट पॅनलवर निवड झालेल्या अंजू तुरंबेकर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉल क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुटबॉल क्षेत्रातून पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव महिला ठरल्या आहेत.
कोल्हापूर येथे स्थायिक असलेल्या अंजू तुरंबेकर या बेकनाळ या छोट्याश्या गावातून आलेल्या आहेत. एखाद्या मुलीने फुटबॉल खेळणे ना समाजाला व त्यांच्या कुटुंबाला मान्य होते. मात्र सर्व विरोध झुगारुन अंजूने शालेय पातळीवर, नंतर राज्यपातळीवर आणि मग महाराष्ट्राची कर्णधार म्हणून तर राष्ट्रीय पातळीवर अंजू तुरंबेकर यांनी फुटबॉल खेळात यश व नावलौकिक मिळवले. घरातून पळून आल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका क्लबकडून खेळायचे ठरवले. पुण्यातला प्रवासही अजिबात सोपा नव्हता. कधी लोकांची धुणीभांडी तर कधी पेट्रोल पंपावर काम करून अत्यंत कठीण परिस्थितीत त्या खेळत राहिल्या. अनेक वर्ष हा खेळ खेळल्यानंतर त्यांनी फुटबॉल व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज 15 वर्षांहून अधिक काळ त्या फुटबॉल क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रामीण भागात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी त्यांचे कार्य सुरु असून, शहरातही त्यांनी अकॅडमीच्या माध्यमातून युवक-युवतींना प्रशिक्षण देत आहे.
देशातील सर्वात तरुण अ परवानाधारक प्रशिक्षिकेचा बहुमान देखील त्यांनी पटकाविला आहे. त्यांनी आजवर आशिया खंडातील अनेक देशांचे फुटबॉल संबंधित काम पाहिले आहे. भारतातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या डेम्पो मेन्स स्पोर्ट्स क्लब मध्ये तांत्रिक संचालक म्हणून कार्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.