शंभर वर्षांचा संघर्ष, त्याग व चळवळींचा जागर; पुढील शतकासाठी नव्या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी
शंभर वर्षे केवळ कालावधी नसून संघर्ष आणि क्रांतीकारक लढ्याचा इतिहास -कॉ. आनंद शितोळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) स्थापनेच्या शताब्दीनिमित्त शहरातील बुरुडगाव रोड येथील पक्ष कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 26 डिसेंबर) उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाकपचे लाल ध्वज फडकावत ‘लाल सलाम’च्या घोषणा देण्यात आल्या. देशासाठी पक्षाने दिलेल्या त्याग, बलिदान आणि संघर्षाच्या इतिहासाची आठवण करून देत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.

भाकपच्या पक्ष कार्यालयातून निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी हातात लाल ध्वज घेत शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज, माळीवाडा येथील महात्मा फुले तसेच मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हमाल पंचायत येथील सभागृहात शताब्दी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. यावेळी कॉ. कारभारी उगले, कॉ. आनंद शितोळे, जिल्हा सह सेक्रेटरी कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे, पांडूरंग शिंदे, श्रीधर आदिक, लक्ष्मण नवले, ज्ञानदेव सहाने, बबनराव पवार, दत्तात्रय आरे, बापूराव राशीनकर, बबनराव लबडे, रमेश नागवडे, भारती न्यालपेल्ली, सगुना श्रीमल, संगिता कोंडा, लक्ष्मीबाई कोटा, कन्हैय्या बुंदेले, सुभाष शिंदे, बेबीनंदा लांडे, आप्पासाहेब वाबळे, दत्ता ढगे, तानाजी सावळे, भारत आरगडे, मारुती दहिफळे, सतीश पवार, राजेंद्र आव्हाड, रामदास वागस्कर, नानासाहेब कदम आदींसह भाकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात कॉ. संतोष खोडदे यांनी 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर येथे भरलेल्या पहिल्या कम्युनिस्ट परिषदेने भारतीय राजकीय जीवनात ठळक वळण दिल्याचे सांगितले. स्वातंत्र्यलढ्यापासून ते लोकशाही, कामगार व सांस्कृतिक चळवळीपर्यंत पक्षाने अनेक संघर्ष उभे केले. देशाची अखंडता व एकात्मता जपण्यात भाकपची महत्त्वाची भूमिका राहिली असून देशासाठी सर्वाधिक बलिदान देणाऱ्या पक्षांपैकी भाकप अग्रस्थानी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, धोरणात्मक मतभेद व राजकीय आव्हानांचा सामना करावा लागल्याचेही त्यांनी नमूद केले. आर्किटेक्ट अर्शद शेख, अशोक सब्बन आणि डॉ. आदित्य न्यालपेल्ली यांनी आपल्या भाषणातून भाकपच्या शताब्दीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कॉ. आनंद शितोळे यांनी स्वातंत्र्यानंतरचा काळ पक्षासाठी संधी व आव्हानांचा असल्याचे सांगितले. कारखाना बंदी, मजुरी-अधिकार, कामगार संघटन, जमीनवाटा, शेतकरी आंदोलन अशा विविध लढ्यांमधून पक्षाने काही ठळक विजय मिळवले. सार्वजनिक संपत्तींचे राष्ट्रीयीकरण, कामगार कायद्यांसाठी आंदोलन आणि न्यायालयीन लढ्यांमुळे कामगारांना वास्तविक सुरक्षा मिळाली. शंभर वर्षे हा केवळ कालावधी नसून अनुभव, संघर्ष आणि क्रांतीकारक इतिहास आहे. डाव्या विचारांनी कला-साहित्य क्षेत्रातही खोल ठसा उमटवला असून प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनसारख्या चळवळींनी जनमानसाशी संवाद साधला, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॉ. ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, समाजातील तळागाळातील शेतकरी, कामगार, उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी पक्षाने सातत्याने संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी भाकपने महत्त्वाचे योगदान दिले. आज इतिहासातून शिकून आधुनिक वास्तवाशी जुळवून घेत कामगारांचे हक्क, सामाजिक समानता आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील शतकासाठी नवे प्रश्न आणि त्यावर ठोस प्रत्युत्तर घेऊन पक्ष सज्ज होत असल्याचे नमूद करत कार्यकर्त्यांना झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले.
प्राचार्य शिवाजी देवढे यांनी 1920 च्या दशकातील कामगार व शेतकरी प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर 1925 मध्ये कानपूर येथे विविध कम्युनिस्ट गट एकत्र येऊन राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाल्याचा इतिहास उलगडला. कानपूर व मेरठसारख्या षड्यंत्र खटल्यांमुळे पक्षाच्या नेतृत्वावर हल्ले झाले, मात्र याच संघर्षातून अनेक नेते जनतेसमोर आले, असा शंभर वर्षांचा ऐतिहासिक आढावा त्यांनी मांडला. ॲड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये तरुण वर्गाला वाव द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट करुन आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयटक व बिडी कामगार युनियनने परिश्रम घेतले.
