• Fri. Apr 10th, 2026

अखेर चिचोंडी पाटीलच्या शासकीय जागेवरील बेकायदेशीर सॉ मिलच्या चौकशीचे आदेश

ByMirror

Apr 9, 2026

बेकायदेशीर अतिक्रमण, विनापरवाना लाकूड कापणी व साठा, तसेच पर्यावरणीय व ध्वनी प्रदूषणाची तक्रार


उपविभागीय अधिकारी यांचे कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना आदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील परिसरातील शासकीय जागेवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमण, विनापरवाना लाकूड कापणी व साठा, तसेच पर्यावरणीय व ध्वनी प्रदूषणाच्या गंभीर तक्रारीवर चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांनी संबंधित विभागाला काढले आहे.


सदर प्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार करुन कारवार्इबाबत पाठपुरावा केला होता. आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची दखल घेत विविध विभागांना तत्काळ चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात महसूल विभागासह पोलीस प्रशासन, ग्रामविकास विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना संयुक्तपणे तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी शासकीय जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले असून विनापरवाना लाकूड कापणी व साठा केला जात आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याबरोबरच ध्वनी प्रदूषणाचेही गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याची बाबही समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अतिक्रमित जागेवर उभारण्यात आलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे समोर आले असून, शासकीय मालमत्तेचा व्यावसायिक वापर होत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात आहे.


महसूल विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अतिक्रमण हटविणे, संबंधितांची नोंद घेणे आणि गाळ्यांच्या भाडेव्यवहारांची पडताळणी करून कायद्यानुसार पुढील कारवाई करणे अपेक्षित आहे. पोलीस विभागाला कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच या प्रकरणातील आर्थिक गैरप्रकारांची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, ग्रामविकास विभागाला स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन तपासून आवश्‍यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.


प्रशासनाकडून संबंधित विभागांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचे प्रकार होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *