निमगाव वाघा येथे बैलपोळा उत्साहात साजरा
बैलांचा मान आजही कायम -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचे कामधेनू असलेल्या बैलांना आकर्षक सजवून गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझीम, गुलाल व भंडाऱ्याच्या उधळणीने वातावरण रंगून गेले होते.
बैलांना सजवून मिरवणुकीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे बिरोबा मंदिर येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे, उपसरपंच किरण जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, पै. विकास निकम, बाबा जाधव, गुलाब जाधव, गुलाब केदार, विजय जाधव, बापू फलके, सागर कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीदरम्यान शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलांना मारुती, नवनाथ व बिरोबा मंदिरात दर्शनासाठी नेले. प्रत्येक मंदिरात बैलांची पूजा करून शेतकऱ्यांनी आपल्या कामधेनू प्रती कृतज्ञता व्यक्त केली. गावात या मिरवणुकीमुळे सजवलेल्या बैलांची जणू जत्राच भरली होती. सरपंच उज्वला कापसे यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत आपली संस्कृती टिकवून ठेवते. आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर आले असले तरीही बैलांचा मान आजही शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे. गावोगावी पोळ्याच्या निमित्ताने जपली जाणारी ही परंपरा म्हणजे ग्रामीण संस्कृतीचे खरे वैभव असल्याचे ते म्हणाले.