• Thu. Aug 28th, 2025

निमगाव वाघा येथे शेतकरी चर्चा सत्र उत्साहात

ByMirror

Aug 27, 2025

खत व्यवस्थापन व उत्पादन वाढीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन


प्रगतिशील शेतकरी किरण जाधव यांचा किसान सन्मान पुरस्काराने गौरव

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शेतकरी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राला शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांना यावेळी कांदा, मका व ऊस या प्रमुख पिकांवरील खत व्यवस्थापन, पिकांची योग्य निगा राखण्याचे तंत्र, तसेच उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या आधुनिक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी तसेच निमगाव वाघा येथील उपसरपंच किरण सुभाष जाधव यांना किसान सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रयोगशील शेती व नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या धाडसामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिजनल मॅनेजर मनोज राणे, कृषी तज्ज्ञ पांडुरंग मगर व विशाल रासकर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा समतोल वापर कसा करावा, माती परीक्षणाचे महत्त्व, रोग व कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना, तसेच हवामान बदलाचा पिकांवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.


गावचे सरपंच उज्वला कापसे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, संजय कापसे, संजय फलके, विजय जाधव, संदीप गायकवाड, सतीश उधार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सरपंच उज्वला कापसे यांनी अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमांची शेतकऱ्यांना गरज असल्याचे मत व्यक्त केले.


शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, पाणी बचतीसाठी ठिबक व स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब करणे, तसेच बाजारपेठेत थेट विक्री करून शेतमालाला चांगला दर मिळविणे या विषयांवरही चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *