सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची -बाळकृष्ण सिद्दम
गरजूंना अल्पदरात चष्मे वाटप
नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढलेले दृष्टीदोष कमी होण्यासाठी नेत्र तपासणी शिबिर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांनी केले.

शहरातील गांधी मैदान येथे प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात थोरात सुपर स्पेशालिटी आय केअर व अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. सीएसआरडीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क ॲण्ड रिसर्च अहमदनगर यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात सर्व शालेय शिक्षकांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
सीएसआरडी येथील एमएस डब्ल्यूच्या मार्गदर्शिका वैशाली पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिराचे उद्घाटन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, प्राथमिकचे शिक्षक रावसाहेब इंगळे, अनंता गाली, शोभा बडगू, रत्ना रच्चा, सरोजिनी आतकरे, पुष्पा म्याकल आदी उपस्थित होते.
या शिबिरात पालक व नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तर गरजूंना शंभर रुपयात नंबरचे चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले होते. शिबिर राबविल्याबद्दल नागरिकांच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी केदार दुर्गा, श्रवण घोगरे, प्रशांत गोयरे, शुभम वाघमारे, हर्षदा मांडेलकर यांनी परिश्रम घेतले.