वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मरियम मजीद यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बंधन लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते डॉ. मरियम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अभिनेते राजेश नन्नवरे, साहित्यिक संजय कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, ॲड. धनंजय जाधव, सुप्रिया जाधव, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उद्योजक राजेश भंडारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष हरीश नय्यर, सेक्रेटरी कुनाल कोल्हे आदी उपस्थित होते.
डॉ. मरियम मजीद यांनी औरंगाबाद येथील प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करून त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे याच संस्थेत स्त्रीरोग शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांच्या उत्कृष्टतेच्या ध्यासामुळे बंगलोरमधील प्रसिद्ध हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हॉस्पिटलमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांची निवड झाली. एक दशकाहून अधिक काळ, डॉ. मरियम शहरात प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून एक विश्वासक चेहरा राहिल्या आहेत. त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये एक हजाराहून अधिक यशस्वी सामान्य प्रसूती आणि दोन हजाराहून अधिक अवघड प्रसूती आणि स्त्रीरोग शस्त्रक्रियांचा समावेश आहे. डॉ. मरियमची त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठीची बांधिलकी त्यांच्या गायनॅक लॅपरोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपीमधील फेलोशिपमधून स्पष्ट होते. अतिशय अवघड प्रकरणे हाताळण्यात डॉ. मॅरियम यांचा हातखंडा आहे.
कोरोना महामारीच्या काळातही, डॉ. मरियम या सर्व गरोदर महिलांसाठी आशेचा किरण ठरल्या. त्यांनी कोविड पॉझिटिव्ह रूग्णांच्या 500 हून अधिक प्रसूती आणि सिझेरियन ऑपरेशनस केल्या आहेत. वंध्यत्व व्यवस्थापनामध्ये त्यांचे विशेष कौशल्य आहे. या त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
