युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांघिक व वैयक्तिक बक्षिसे पटकाविली
युवकांना सकारात्मक दिशेने प्रवृत्त करण्यासाठी क्रीडा हे अत्यंत प्रभावी साधन -सत्यजीत संतोष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारत या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या जिमखाना मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. विविध क्रीडा प्रकारांमध्ये युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांघिक व वैयक्तिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत बक्षिसे पटकावली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल आठरे, जिमखाना चेअरमन अनंत पंडित, तसेच शरद मगर, धन्यकुमार हराळ, रमेश गाडगे, श्रीकृष्ण मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते.
उपप्राचार्य अनिल आठरे म्हणाले की, “आजच्या या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील उर्जा, आत्मविश्वास आणि संघभावना स्पष्टपणे दिसून येत आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती तर वाढतेच, पण मानसिक बळ, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणही विकसित होतात. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी खेळ आत्मसात केला पाहिजे. या स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून, सहभागातून शिकण्यासाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष म्हणाले की, “मेरा युवा भारत या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील युवकांना सकारात्मक दिशेने प्रवृत्त करणे आणि त्यांच्या अंगभूत गुणांना वाव देणे. क्रीडा हे त्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना एकत्र आणून त्यांना समान संधी देणे हे आमचे ध्येय आहे. खेळातून केवळ शरीरच नव्हे तर मन आणि विचारही मजबूत होतात. त्यामुळे युवकांनी मोबाईल व सोशल मीडियापेक्षा खेळाच्या मैदानाकडे अधिक लक्ष देण्याचे त्यांनी आवाहन केले.
वैयक्तिक स्पर्धांचे निकाल:
100 मीटर धावणे (मुली) : प्रथम- रजनी मिश्रा, द्वितीय- आरती जवरे, तृतीय- रूपाली दानवे
200 मीटर धावणे (मुले) : प्रथम- साहिल खाटेकर, द्वितीय- महेश माळी, तृतीय- आदित्य माळी
गोळा फेक (मुली) : प्रथम- ऋतुजा जवरे, द्वितीय- पल्लवी रोकडे, तृतीय- रिया शर्मा
गोळा फेक (मुले) : प्रथम- ओम टकले, द्वितीय- प्रतीक परभणे, तृतीय- तुषार आजबे
सांघिक स्पर्धांचे निकाल:
खो-खो : प्रथम- रिया शर्मा व संघ (ग्रुप), द्वितीय- सोनाली नायका (बी ग्रुप)
व्हॉलीबॉल : प्रथम- छत्रपती ग्रुप, द्वितीय- वीरेंद्र क्लब
कबड्डी : प्रथम- सहयोग क्रीडा मंडळ, द्वितीय- वाडिया पार्क
या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे विशेष सहकार्य लाभले. उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या.
