जागतिक दिव्यांग दिनाचा उपक्रम
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समाज पुढे येणे गरजेचे -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवनाथ विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी श्री नवनाथ युवा मंडळ, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, शहर टाकळी हायस्कूलचे प्राचार्य बाळासाहेब भगत, सौ. भगत, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पांडूरंग कुलट, प्रणिता कुलट, विज्ञान शिक्षक शरद भोस, मंदा साळवे, तेजस केदारी, तुकाराम पवार, स्वाती इथापे, निकिता रासकर-शिंदे, दिपाली ठाणगे-म्हस्के, रेखा जरे-पवार, आप्पा कदम, प्रमोद थिटे, संदीप डोंगरे, प्रशांत जाधव, लहानबा जाधव तसेच मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थी ओम गवळी, ओम इंगळे, तनिष्का केदार, सारिका काळे, आदित्य कापसे यांना पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असल्याचे मत दिव्यांग मुलांच्या पालकांनी व्यक्त केली. केंद्रीय विज्ञान परीक्षेत युवराज कर्डिले व अक्षदा भगत यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा विज्ञान परीक्षेसाठी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, जागतिक दिव्यांग दिन हा फक्त औपचारिकता नसून, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. दिव्यांगत्व स्वत: मधील कमीपणा नसून एक वेगळेपण आहे. योग्य आधार, प्रेम आणि मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. विद्यार्थी दशेत समाजाने त्यांना साथ देण्याची हीच खरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व रमेश गाडगे यांनी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
