महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठीचा उपक्रम
दीन-दलितांचा उध्दार करुन बाबासाहेब ‘संविधान नायक’ ठरले -सुनिल सकट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचार प्रबोधनाचा उपक्रम राबविण्यात आला. शासनाचा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुनिल सकट आणि शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले राधेलाल नकवाल यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मार्केटयार्ड येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे बाबासाहेबांचे विचार समाजात घेऊन जाण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी शासनाचा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त हिराताई गोरखे, सत्यजित संतोष, ॲड. महेश शिंदे, शाहु फुले आंबेडकर साठे कलाम विचार मंचाचे संस्थापक अशोक शिंदे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गायकवाड, उषाताई शिंदे, मानवी हक्क अभियानचे शहराध्यक्ष अशोक भोसले, ॲड. विद्या शिंदे, भाजपा चिटणीस चंद्रकांत पाटोळे, रजनीताई ताठे, दत्तात्रय गोरखे, लखन साळवे आदी उपस्थित होते.
सुनिल सकट म्हणाले की, बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन हा सकल भारतीयांसाठी असह्य दुःखाची आठवण करून देणारा दिवस ठरतो. दीन-दलित, बहुजन, उपेक्षित घटकांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी त्यांनी अखंड कार्य केले. प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेत तब्बल बत्तीस पदव्या मिळवून त्यांनी संविधानाच्या निर्मितीत थोर योगदान दिले. भारतीय संविधानाद्वारे बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला अनेक मूलभूत आणि संविधानिक अधिकार प्रदान केले. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ‘संविधान नायक’ ठरल्याचे त्यांनी सांगितले.
राधेलाल नकवाल म्हणाले की, भारतीय संविधान हे मानवी मूल्यांचे रक्षण करणारे दस्तावेज आहे. आज देश जागतिक पातळीवर अग्रस्थानी उभा आहे, ते फक्त संविधानाच्या चौकटीमुळेच शक्य झाले आहे. बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ आजही समाजाच्या प्रगतीचा मार्गदर्शक ठरत आहे. पुस्तक वाटप हे केवळ स्मरण नव्हे, तर बाबासाहेबांची विचारधारा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रभावी कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
