परिसरातील नागरिकांनी घेतली उपायुक्तांची भेट
मनपा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असताना गायकवाड कॉलनीसह स्थानिक नागरिकांनी उपायुक्त विजयकुमार मुंडे व शहर अभियंता मनोज पारखे यांची भेट घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरचा गंभीर प्रश्न मांडला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, मुकुंद पालवे, अक्षय सूर्यवंशी, विजय औटी, अशोक कर्डिले, राहुल दरेकर, शेखर शेंडे, प्रताप मारवाडी, राजेंद्र कचरे, अशोक मुळे, प्रवीण रणखांब, हातवळणे, अमित कचरे, शिवम देवगुणे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सावेडी मधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात ओढ्यामध्ये काही नागरिकांनी मैल मिश्रित पाणी सोडल्यामुळे परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डेंगूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, सर्वत्र दुर्गंधी देखील पसरली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या ओढ्याच्या जवळून पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन जात असल्याने नळाद्वारे देखील घाण पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. तर या घाणीतून सल्फरडाय ऑक्साईड सारखी वायु निर्मिती होत असल्याने भविष्यात नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम उद्भवणार आहे. मैल मिश्रित पाणी ओढ्यात न सोडता सेप्टिक टँक अथवा ड्रेनेजमध्ये बंदिस्त गटारी या कार्य पद्धतीने सोडण्याची व्यवस्था करण्याचे म्हंटले आहे.
उपायुक्त मुंडे यांनी घेतला तातडीने निर्णय
नागरिकांच्या तक्रारीनंतर उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सदर परिसराची पाहणी करुन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका प्रशासन समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ते पावले उचलणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.