हनुमान चालीसा पठणाने भक्तीमय वातावरण; भजन-कीर्तनांनी परिसर दुमदुमला
महिला व अबालवृद्धांची उत्स्फूर्त उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रोड येथील आनंदनगर परिसरात “राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की जय हनुमान ज्ञान गुण सागर” अशा जयघोषात आणि सामूहिक हनुमान चालीसा पठणाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री हनुमान चालीसा पाठ भक्ती संध्येला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दत्त मंदिर परिसरात मंगल भक्त सेवा मंडळाच्या सहकार्याने हा भक्तिमय सोहळा पार पडला. कार्यक्रमास महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सामूहिक पठणात सहभाग घेतल्याने धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषाने करण्यात आली. त्यानंतर “ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने” आणि “देवा हो देवा गणपती देवा” या भक्तिगीतांनी वातावरणात अधिक रंगत आणली. दत्त महाराजांचे भजन, आईचा जोगवा यांसारख्या गीतांनी संपूर्ण परिसर भक्तीभावाने न्हाऊन निघाला.
सामूहिक नामस्मरण, हनुमान चालीसा गायन आणि विविध भक्तिगीतांच्या सादरीकरणादरम्यान उपस्थित भाविक तल्लीन झाले होते. बालगोपाळांनीही उत्साहाने भजनांवर ठेका धरत कार्यक्रमात रंगत आणली. मंगल भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून श्री विश्वेश्वर स्वामी महाराज उर्फ राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भक्ती संध्येचे सहावे पुष्प होते. धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असा संदेश या भक्ती संध्येतून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ व महिला मंडळाने परिश्रम घेतले. शेवटी आरतीने भक्तीमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
