लोकमकात्या टक्केवारी राष्ट्रीय महामार्ग नामकरण; शासनाच्या सत्याचाराचा आरसा!
लोकभज्ञाक चळवळ साई-सूर्यनामा आंदोलनातून वेधणार लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षांपासून नागरिक आणि भाविकांच्या संयमाचा अंत पाहत असलेला नगर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग आज राष्ट्रीय या शब्दालाही लाजवणारा ठरला आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग आज खड्डे, धूळ, आणि धोक्यांचा मार्ग बनला असल्याचा आरोप लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनातील भ्रष्टाचार आणि उदासीनतेविरोधात एक आगळेवेगळे आंदोलन उभे केले असून, हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग नव्हे, तर लोकमकात्या टक्केवारी राष्ट्रीय महामार्ग या नावाने ओळखला जाईल, अशी घोषणा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दररोज हजारो वाहनधारक आणि भाविकांचा जीव या रस्त्यावर धोक्यात असतो. शासनाने चार वेळा ठेकेदार बदलले, अनेकदा मंत्र्यांनी आश्वासनांची फुले उधळली, परंतु प्रत्यक्षात रस्ता आजही अपूर्णच आहे. लोकमकात्या म्हणजे मला काय त्याचं शासनकर्त्यांचा, मंत्र्यांचा आणि ठेकेदारांचा जनतेच्या दुःखाकडे असलेला निर्लज्ज उदासीन दृष्टिकोन. टक्केवारी म्हणजे भ्रष्टाचाराची ती संस्कृती, जिथे काम प्रामाणिकपणाने नव्हे, तर कमिशन आणि व्यवहाराने चालते. या दोन शब्दांच्या संगमातून उभा राहतो तो लोकजागृतीचा प्रतीकात्मक महामार्ग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकभद्न्यक चळवळीने या नामकरणाला केवळ आंदोलन म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक आणि नैतिक शुद्धीचा सोहळा ठरवले आहे. या आंदोलनाला साई-सूर्यनामा असे नाव देण्यात आले असून, सूर्यदेवाला सत्य, पारदर्शकता आणि न्यायाचा सनातन साक्षीदार म्हणून हे आंदोलन केले जाण्आर असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
हा रस्ता त्या सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पुरावा आहे. ज्यांनी आपल्या कर्तव्याचा विश्वासघात केला. लोकशाही आता लोकभज्ञाकशाहीत रूपांतरित व्हावी. जी लोकभक्ती (जनसेवा), ज्ञानभक्ती (सत्यजागर), आणि कर्मभक्ती (निष्काम कृती) या त्रिसूत्रीवर उभी आहे. नगर-शिर्डी महामार्ग जो आज भ्रष्टाचाराचे प्रतीक ठरला आहे, तोच आता जनतेच्या चेतनेचा दीपस्तंभ बनत आहे. लोकमकात्या टक्केवारी महामार्ग, या नावाने जनता शासनाला आरसा दाखवत आहे. प्रत्येक खड्डा आज शासनाच्या अपूर्ण वचनांचे स्मारक ठरत आहे. सत्य कधीही भ्रष्टाचाराच्या सावलीत कायम लपून राहू शकत नाही.
लोकभद्न्यक चळवळीचा हा जनआक्रोश अखेर शासनाला सत्याचाराच्या दिशेने प्रवृत्त करेल अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. या आंदोलनासाठी ॲड. गवळी, ॲड. संजय जव्हेरी, अशोक सब्बन, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती प्रयत्नशील आहेत.